

पिंपरी, ता. २ : हिंजवडी आयटी पार्कसह माण आणि मारुंजी परिसराला भेडसावणारी वाहतूक कोंडी, भूसंपादनाचा तिढा आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलवली आहे. गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता व्हीआयपी सर्किट हाऊस येथे ही तातडीची बैठक होणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त, ‘पीएमआरडीए’ आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मेट्रोचे प्रतिनिधी तसेच प्रादेशिक उद्योग व वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘स्मार्ट आयटी सिटी संकल्प मोर्चा’ आणि ‘हिंजवडी उद्योजक असोसिएशन’देखील भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांसाठी तातडीने भूसंपादन पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मोबदला देणे, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामाला गती देणे. परिसराच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता स्वतंत्र नगरपरिषद, महापालिका अथवा सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत ठोस धोरण ठरवण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, या भागाची पाहणी करावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या विषयांवरही आढावा
वाकड उड्डाणपूल आणि प्रमुख चौकांमधील दररोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्मार्ट सीसीटीव्हीसह अत्याधुनिक यंत्रणा उभारणे, मुळशी धरणातून किमान २ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, पादचारी मार्ग आणि पथदिवे या मूलभूत सुविधांचा आढावा बैठकीत घेतला जाईल.