मंडळे वाढली, पण बक्षिसांचे ‘लोणी’ कमीच

मंडळे वाढली, पण बक्षिसांचे ‘लोणी’ कमीच
Published on

ज्ञानेश्वर भंडारे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : चौकाचौकांत भव्य व्यासपीठ... दुतर्फा इच्छुकांचे फलक... सिनेतारकांची उपस्थिती... ‘डीजे’चा दणदणाट आणि गोविंदा पथकांसाठी लाखोंच्या बक्षिसांची घोषणा, असे चित्र गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात दिसले होते. यंदा मात्र निवडणूक झाल्यामुळे दहीहंडीतील ‘राजकीय’ उत्साह ओसरला आहे. पारंपरिक मंडळांचे मोजके मोठे कार्यक्रम वगळता, नव्याने मैदानात उतरणाऱ्या राजकीय आयोजकांची संख्या घटली आहे. परिणामी, यंदाच्या गोपाळकाल्यात बक्षिसांचे ‘लोणी’ कमी असण्याची चर्चा आहे.
शहरात दहीहंडी उत्सव शनिवारी (ता. ५) होत आहे. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात मंडप, फलक आणि बक्षिसांच्या जाहिरातींचा जोर कमी दिसत आहे. भोसरी, इंद्रायणीनगर, वाकड आणि पिंपरी परिसरातील काही मंडळांकडून पारंपरिक कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, मोशी आणि चिखली या भागांत राजकीय इच्छुकांकडून होणारे छोटे-मोठे कार्यक्रम काही प्रमाणात घटले आहेत.


प्रचाराचे ‘लोणी’ यंदा नाही
महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपल्यानंतर निवडणूक सातत्याने लांबणीवर पडली होती. गेल्या वर्षी प्रभागरचना आणि मतदारयादीचे काम सुरू झाल्यामुळे निवडणूक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. संभाव्य प्रभागांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दहीहंडी उत्सवाचा वापर करण्यात आला. काहींनी स्वतःच्या नावाने मंडळे आणि युवा प्रतिष्ठाने स्थापन करून भव्य कार्यक्रमांची घोषणा केली होती. सिनेतारका, समाजमाध्यमांवरील ‘रील स्टार’, गायक आणि खेळाडूंना बोलावून गर्दी खेचण्याची स्पर्धा रंगली होती. यंदा निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे इच्छुकांची गर्दी आणि मतदारांवर छाप पाडण्यासाठी होणारी खर्चाची स्पर्धा कमी झाली आहे. निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम करणाऱ्यांची नावे यंदा दिसत नसल्याची चर्चा आहे.

पारंपरिक कार्यक्रमांची तयारी
अनेक कार्यक्रमांना पुणे-मुंबईतील पथकांसह सिनेतारकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी राजकीय नेते आणि इच्छुकांकडून स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या मोठ्या कार्यक्रमांच्या तुलनेत यंदा ही संख्या कमी दिसत आहे. ‘राजकीय कार्यक्रम’ अशी स्वतंत्र वर्गवारी केली जात नसल्यामुळे त्यांची नेमकी अधिकृत संख्या उपलब्ध नाही, असे पोलिसांनी सांगितले.

बक्षिसांच्या रकमेतही आखडता हात
गेल्या वर्षी पिंपरीतील एका मंडळाने सात लाख ७० हजार ७७७ रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती. शहरातील अन्य मोठ्या कार्यक्रमांतही सहा, सात आणि आठ थरांची सलामी देणाऱ्या पथकांसाठी रोख बक्षिसे होती. अनेक आयोजकांनी पथकांना सहभागासाठी स्वतंत्र मानधन अर्थात ‘सुपारी’ही दिली. यंदा काही मंडळाच्या जाहिरातीत प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अन्य पारंपरिक कार्यक्रमांनाही बक्षिसे दिली जाणार असली, तरी गेल्या वर्षीप्रमाणे सात ते अकरा लाखांच्या रकमांचा गाजावाजा दिसलेला नाही.

माहिती ऑनलाइन उपलब्ध व्हावी
यावर्षी शहरात १३० मोठी, तर १२८ लहान दहीहंडी मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. सार्वजनिक उत्सवाच्या पारदर्शक नियोजनासाठी ही माहिती प्रशासनाने संकेतस्थळावर उपलब्ध करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दहीहंडीसाठी आवश्यक परवानग्या
१. पोलिस परवानगी
२. मंडप उभारणीची परवानगी
३. वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र
४. ध्वनिक्षेपक वापराचा परवाना
५. अग्निशमन, विद्युत सुरक्षा आणि जागामालकाची परवानगी
६. पोलिसांच्या ध्वनिक्षेपक परवानगी ऑनलाइन अर्जात मंडप परवाना अथवा सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक

अजितदादांच्या निधनाने अनेकांचे नियोजन रद्द
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने काही मंडळांनी यंदा दहीहंडी आणि संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केलेले नाही. चिखलीतील साने चौक येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल, दत्ताकाका साने प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात येते. मात्र, यावर्षी हा उत्सव केला जाणार नाही, असे सांगण्यात आले.

आकडे बोलतात...
वर्ष - मंडळांची संख्या
२०२४ - १७५
२०२५ - १५०
२०२६ - २५८ (गुरुवारपर्यंत)
(माहिती स्रोत : पोलिस आयुक्तालय)

संग्रहित छायाचित्र
46882

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com