‘एनसीएमसी’ची पावती दाखवा; सवलतीचा लाभ घ्या

‘एनसीएमसी’ची पावती दाखवा; सवलतीचा लाभ घ्या
Published on

सकाळ इम्पॅक्ट

पिंपरी, ता. २ ः नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्डची (एनसीएमसी) नोंदणी करुनही कार्ड न मिळालेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आता नोंदणी केलेली पावती दाखवून सवलतींचा लाभ घेता येणार आहे. राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह विविध घटकांनाही एसटी तिकीट दरांत सवलत देण्यात आलेली आहे. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एक सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ‘एनसीएमसी’ची नोंदणी करुनही केवळ कार्ड न मिळाल्यामुळे अनेक महिला, ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढावे लागत होते. त्यावरुन प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंग उद्‍भवत होते. याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. २) ‘एनसीएमसी’साठी नोंदणी; मात्र सवलतीपासून वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने एनसीएमसी कार्ड नोंदणी केली आहे. परंतु अद्याप कार्ड प्राप्त न झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना कार्ड नोंदणी केलेली पावती ग्राह्य धरुन सवलतीच्या (मॅन्युअल) तिकीटावर प्रवास करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुभा दिली आहे.

तीर्थाटन योजनेलाही लागू
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजने अंतर्गत विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना १२ सप्टेंबरपर्यंत पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून तिकीट देण्यास विविध अडचणी येत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने १४ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना सवलतीच्या (मॅन्युअल) तिकीटावर प्रवास करण्यास मुभा दिली आहे. तसेच ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग केले आहे. अशा प्रवाशांना एका वेळेस एनसीएमसी कार्ड अनिवार्य न करता प्रवाशांना सवलतींच्या दरात प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

ग्रुप बुकिंगचा फायदा
गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी अनेकांनी ग्रुप बुकिंग केले आहे. तर काहीजण ग्रुप बुकिंग करणार आहेत. याबसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य न करता त्यांना आरक्षित केलेल्या तिकीटावर सवलतींच्या दरात प्रवास करता येणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com