सीसीटीव्हीचा ‘डोळा’; पुरावे करतो गोळा

सीसीटीव्हीचा ‘डोळा’; पुरावे करतो गोळा
Published on

पिंपरी, ता. २६ : गुन्ह्यांच्या तपासासह इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही (क्लोज्ड-सर्किट टेलिव्हिजन) हे पोलिसांसाठी प्रभावी साधन ठरत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक, व्यावसायिक आस्थापना, बँका, एटीएम तसेच निवासी भागांत तैनात असलेल्या या कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांचे स्वरुप, त्यातील आरोपी, त्याची तीव्रता आणि गुन्हा घडण्याची नेमकी पद्धत अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळे तपासासाठीही मोठी मदत होत आहे.

पूर्वी एखाद्या घटनेनंतर तपासात पोलिसांना अनेकदा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर अवलंबून राहावे लागायचे. मात्र, आता सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनास्थळी घडलेली प्रत्येक हालचाल ‘रेकॉर्ड’ होत असल्याने तपास अधिक अचूक आणि विश्वासार्ह झाला आहे. महापालिका हद्दीत ठिकठिकाणी महापालिका व स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही बसविले आहेत. याचे ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ निगडी येथे आहे. शहरातील सर्व सीसीटीव्हींद्वारे टिपलेले फुटेज येथे पाहता येते. याची मदत पोलिसांनाही व्हावी, यासाठी चिंचवड स्टेशन येथील जुन्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी स्वतंत्र पाहणी कक्ष उपलब्ध आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहतूक व्यवस्थापनातही होतेय मदत
‘‘वाहतूक व्यवस्थापनातही सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. एखाद्या अपघातात नेमकी चूक कोणाची, सिग्नलचे उल्लंघन झाले का, वाहनाचा वेग किती होता याचा अंदाज फुटेजमधून घेता येतो. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करणेही सोपे झाले आहे,’’ असे पोलिसांनी सांगितले.


पोलिस आयुक्तालय हद्दीत ग्रामीण भागातही कॅमेरे
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शहर व ग्रामीण भाग समाविष्ट आहे. शहरी भागात महापालिकेची सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, ग्रामीण भागात ही यंत्रणा अपुरी आहे. त्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

*सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झालेल्या काही घटना
- पन्नास लाखांच्या खंडणीसाठी काळेवाडी येथून व्यावसायिकाचे अपहरण करून उत्तरप्रदेशात नेताना आरोपींच्या तावडीतून व्यावसायिकाची सुटका
- भोसरी व परिसरांत बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक
- दुचाकी चोरी व घरफोडीतील आरोपीला म्हाळुंगे येथून अटक
- रिक्षा चोरून, जबरी चोरीतील आरोपी बारा तासांत अटकेत
- हिंजवडी येथे सोनसाखळी चोरणाऱ्याला शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्हींची पाहणी करून मांजरी येथून ताब्यात घेतले.

शहरांत ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. शहराच्या प्रमुख चौकांसह, शहराचे प्रवेशद्वार तसेच पोलिसांनी सुचविलेले पॉइंट याठिकाणी हे कॅमेरे उभारण्यावर भर दिला आहे. सर्व कॅमेरे कार्यान्वित आहेत. पोलिसांसाठी चिंचवड स्टेशन येथे स्वतंत्र पाहणी कक्ष उभारला आहे.
- विजय बोरुडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका.

पोलिस तपासासह इतर कामकाजासाठी चिंचवड स्टेशन येथे महापालिकेच्या जुन्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी पाहणी कक्ष अस्तित्वात आहे. येथे अधिकारी व कर्मचारीही आहेत. आयुक्तालयांतर्गत घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासह बाहेरील पोलिसांनाही तपासासाठी येथे मदत केली जात आहे.
- उमेश पुलगम, सहायक फौजदार तथा पाहणी कक्ष प्रमुख

सीसीटीव्हीचा पोलिसांना होणारा उपयोग
- गुन्हेगारांची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) अभ्यासणे शक्य
- आरोपींची ओळख पटविणे
- आरोपींचे येण्या-जाण्याचे मार्ग शोधणे
- वाहनांची माहिती मिळविणे
- गुन्ह्यापूर्वी आणि नंतरच्या हालचालींचा मागोवा घेणे
- गुन्हेगार कोणत्या वेळेत, कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे गुन्हा करतात या माहितीचे संकलन
- प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास मदत


महापालिका व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कॅमेरे

कॅमेराचा प्रकार स्थिर फिरते
स्मार्ट सिटी प्रकल्पातील १,५५० ५४३
महापालिका यंत्रणेचे ४,३५० ९५०

एकूण ५ हजार ९०० १ हजार ४९३
----------
शहरातील एकूण सीसीटीव्ही : ७ हजार ३९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com