वाढत्या रिक्त पदांमुळे महापालिकेची दमछाक

वाढत्या रिक्त पदांमुळे महापालिकेची दमछाक
Published on: 

पिंपरी, ता. २५ : शहराचा विस्तार आणि नागरी सेवांचा व्याप वाढत आहे. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकेतील मंजूरपैकी सुमारे ३९ टक्के पदे रिक्त आहेत. उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतानाच अतिरिक्त पाच हजार ३२५ पदांच्या निर्मितीचा प्रस्तावही राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सादर केलेल्या सुधारित आकृतीबंधावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने महापालिकेच्या मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे.

महापालिकेच्या जुन्या आकृतीबंधानुसार ११ हजार ५१३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सात हजार ५३ पदांवर अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यांसह विविध नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. मात्र, मंजूर पदेही पूर्ण क्षमतेने भरलेली नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच सर्व विभागांचा कारभार सुरू आहे.
वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने एकूण १६ हजार ८३८ पदांचा सुधारित आकृतीबंध तयार केला आहे. त्यामध्ये विविध संवर्गांतील पाच हजार ३२५ नवीन पदांची निर्मिती प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव सप्टेंबर २०२३ मध्ये राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, मंजुरीअभावी अतिरिक्त पदनिर्मिती आणि त्यानुसार भरतीला गती मिळालेली नाही.
सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यकतेनुसार नवीन पदांच्या भरतीचे नियोजन करता येणार आहे. मात्र, सध्याच्या मंजूर आकृतीबंधातील रिक्त पदे भरणे आणि प्रस्तावित नवीन पदांना मान्यता मिळविणे, अशा दोन्ही पातळ्यांवर कार्यवाहीची गरज आहे.

...अन्यथा तफावत कायम राहणार
पूर्वी नोकरभरतीवरील निर्बंध आणि कोरोना काळामुळे मोठ्या प्रमाणावर पदे भरता आली नव्हती. वैद्यकीय, आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित पदांच्या भरतीला प्राधान्य देण्यात आले होते. आता रिक्त पदे भरताना नागरिकांच्या दैनंदिन सेवांशी संबंधित विभागांना प्राधान्य देण्याची गरज आहे. अन्यथा, वाढता कार्यभार आणि अपुरे मनुष्यबळ यांतील तफावत कायम राहणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त
महापालिकेच्या आस्थापनेवरील हजारो पदे रिक्त असताना विविध कामांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सेवांसाठी कंत्राटी मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत आहे. नियमित पदे भरण्याला विलंब होत असताना कंत्राटी व्यवस्थेवरील ही भिस्त आणखी किती काळ कायम राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सुधारित आकृतीबंध तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होईल.
- संदीप खोत, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका

मनुष्यबळाचा लेखाजोखा
- सध्या मंजूर पदे - ११,५१३
- कार्यरत अधिकारी-कर्मचारी - ७,०५३
- रिक्त पदे - ४,४६०
- प्रस्तावित नवीन पदे - ५,३२५
- सुधारित आकृतीबंधातील एकूण पदे - १६,८३८

प्रस्तावित आकृतीबंधातील वर्गनिहाय पदे
- ‘अ’ वर्ग : ४७६
- ‘ब’ वर्ग : ५५७
- ‘क’ वर्ग : ८,०४१
- ‘ड’ वर्ग : ७,७६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com