

चिंचवड, ता.२६ : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आणि तीन वर्षांपासून बोनस थकल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरूनगर येथील पशु चिकित्सालयातील सुमारे १२० कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे चिकित्सालयातील विविध सेवा विस्कळीत झाल्या असून, रुग्णवाहिकाही बंद स्थितीत आहे.
महापालिकेच्या पशु चिकित्सालयातील कामकाजासाठी खासगी एजन्सीमार्फत १ ऑगस्ट २०२३ पासून कर्मचारी पुरविण्यात येत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
या चिकित्सालयात दोन शिफ्टमध्ये डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक, मजूर, हेल्पर, डॉग कुली आणि स्वच्छता निरीक्षकांसह सुमारे १२० कर्मचारी काम करतात. शहरातील भटके श्वान, मांजर, गायी आणि बैल पकडून आणणे, आजारी प्राण्यांवर उपचार करणे, इंजेक्शन देणे, सलाईन लावणे तसेच श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करणे आदी महत्त्वाची कामे या कर्मचाऱ्यांकडून केली जातात. मात्र, काम बंद आंदोलनामुळे या सेवांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
मूलभूत सुविधांचाही अभाव
सध्या अनेक दिवसांपासून चिकित्सालयाचा गॅसपुरवठाही बंद असल्याने उपचारासाठी आलेल्या प्राण्यांसाठी चुलीवर अन्न शिजवावे लागत असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे. सध्या २० ते २२ श्वान अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आहे. तसेच अनुभवी डॉक्टरांची कमतरता, शल्यचिकित्सक डॉक्टर उपलब्ध नसणे, एक्स-रे मशीन आणि फ्रीझर बंद अवस्थेत असणे अशा समस्याही असल्याचे दिसून येत आहे.
वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याची वेळ येत असेल, तर त्याचा थेट परिणाम मुक्या प्राण्यांच्या उपचारांवर होणार आहे. महापालिकेने केवळ आश्वासने न देता ठेकेदाराकडून वेळेत वेतन मिळेल, याची ठोस व्यवस्था करावी. पशु चिकित्सालयातील डॉक्टरांची कमतरता, बंद यंत्रसामग्री आणि मूलभूत सुविधांच्या अभावाकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रियांका डोळस, प्राणीमित्र
पशु चिकित्सालयातील काही कर्मचाऱ्यांनी काम बंद केले असून, काही कर्मचारी नियमित काम करत आहेत. महापालिकेकडून आचारसंहितेपर्यंतची सर्व बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे काही अडचणी निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असण्याची शक्यता आहे. संबंधित एजन्सीला उद्यापर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.