

पिंपरी, ता. ३१ ः दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्प येथील बाजारपेठेत गर्दी हळूहळू वाढत असताना वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्याचे लालबहादूर शास्त्री भाजी मंडईलगतचे वाहनतळ अपुरे पडत असल्याने बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. अन्यथा रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूककोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
पिंपरी कॅम्पमधील शगुन चौक, साई चौक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात कपडे, सजावटीचे साहित्य व पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक येतात. इंदिरा गांधी उड्डाणपूल, पिंपरी रेल्वे स्थानक, भाजी मंडई, साई चौक आणि काळेवाडीकडील रस्ते शगुन चौकात एकत्र येतात. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांबरोबरच या भागातून पुढे जाणाऱ्या वाहतुकीचाही ताण चौकावर पडतो.
भाजी मंडईजवळील सध्याची पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होऊन कोंडी होणे, ही समस्या कायमची झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर आणि अतिरिक्त वाहनतळ निश्चित करणे आवश्यक आहे. दुकानांसमोरील साहित्य अथवा उभी वाहने पादचाऱ्यांच्या मार्गात येणार नाहीत, याचीही खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. लहान मुलांसह खरेदीला येणारे पालक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सुरक्षितपणे चालता येण्यासाठी मोकळी वाट ठेवणे आवश्यक आहे.
महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधून पार्किंगची ठिकाणे, मालाच्या चढ-उताराची वेळ आणि गर्दीच्या चौकांतील बंदोबस्त निश्चित करायला हवा. पर्यायी वाहनतळ कुठे असणार आणि तेथून बाजारपेठेत कसे पोहोचायचे, याची माहिती देणारे फलकही आवश्यक आहेत.
इथे नियोजनाची गरज
- लालबहादूर शास्त्री भाजी मंडईलगतचे वाहनतळ व प्रवेश मार्ग
- शगुन चौकातील वाहनांची रहदारी
- शगुन चौक ते साई चौक बाजारपेठेतील मार्ग
- रेल्वे स्थानकाकडून बाजारपेठेत येणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षा
दिवाळीमध्ये ग्राहकांची गर्दी वाढते; पण वाहन लावण्यासाठी जागा मिळाली नाही, तर खरेदीवरही परिणाम होतो. बाजारपेठेजवळ पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून दिशादर्शक फलक लावावेत.
- नीरज चावला, कापड व्यावसायिक
कुटुंबासोबत खरेदीला आल्यानंतर वाहन कुठे लावायचे? हाच पहिला प्रश्न पडतो. लहान मुलांना घेऊन वाहनांच्या गर्दीतून चालणे अवघड होते. सुरक्षित पार्किंग आणि चालण्यासाठी मोकळी वाट हवी.
- राजेश पाटील, नागरिक
पिंपरी कॅम्प परिसरात एकेरी वाहतूक आणि अवजड वाहनांना बंदी केली आहे. अवजड वाहनांना माल उतरविण्यासाठी वेळा दिलेल्या आहेत. वाहतूक विभाग आणि क्षेत्रीय स्तरावर वेळोवेळी वाहतूक नियमांबाबत पर्याय अवलंबिले जात आहेत. पार्किंगबाबत भूमी आणि जिंदगी विभागाकडून माहिती मागवली आहे.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.