दिवाळीसाठी गावी जाताय? बंद घरांवर चोरट्यांची नजर!

दिवाळीसाठी गावी जाताय? 
बंद घरांवर चोरट्यांची नजर!
Published on: 

पिंपरी, ता. २ : पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने शहरात कामगार वर्गाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. रोजगाराच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून अनेक कामगार शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळी सणानिमित्त हे कामगार कुटुंबासह आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्या, कामगार वसाहतीतील घरे काही दिवसांसाठी बंद राहतात. अशा बंद घरांवर चोरट्यांची नजर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सणासुदीच्या सुट्टीनिमित्त गावी जाताना घराच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या तब्बल २५ घटना घडल्या आहेत.

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, चिखली, तळवडे, मोशी, वाकड, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव आदी परिसरांत कामानिमित्त आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यातील काही नागरिक भाड्याच्या घरात किंवा कामगार वसाहतींमध्ये राहतात. सणासाठी गावी जाताना अनेकजण घरातील सर्व सदस्यांसह बाहेर पडतात. परिणामी, संबंधित घर अनेक दिवस बंद असते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. काहीवेळा नागरिक गावी जाण्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. दरम्यान, घर बंद असल्याबाबत इतरांना माहिती मिळते. या माहितीचा गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जाऊ शकतो.

ही काळजी घ्या!
- घराला मजबूत कुलूप आणि सुरक्षित दरवाजे लावावेत
- दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे
- विश्वासू शेजारी किंवा नातेवाइकांना घर बंद असल्याची माहिती द्यावी
- सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी
- घर बंद असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे
- सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना घर बंद ठेवून गावी जात असल्याची पूर्वकल्पना द्यावी
- संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे

२०२५ ऑक्टोबरमधील घरफोडीच्या घटना
घटना दिवसा रात्री
२५ ६ १९
---
‘‘घरफोडी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांसह औद्योगिक पट्ट्यातही पोलिसांची सतत गस्त सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी गावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
- सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.