आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च उपक्रम

आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च उपक्रम
Published on

पिंपरी, ता. १४ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ यांचा जयंती उत्सव मंगळवारी विविध‎ उपक्रमांनी साजरा झाला. पिंपरी चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. शहरात‎ दिवसभरात दुचाकी रॅली, पुस्तक‎ प्रदर्शन, व्याख्यानांसह मिरवणूकीतून‎ हजारो भीमसैनिकांनी निळे झेंडे हातात‎ घेऊन ‘जय भीम’चा नारा दिला.
पांढऱ्या साड्या, निळे फेटे आणि हातात निळे झेंडे अशा पारंपरिक व भीमशक्तीचे प्रतीक असणाऱ्या पेहरावात महिलांनीही बाबासाहेबांचा नामघोष करीत रॅलीत भाग घेतला. पिंपरीत सकाळपासुनच अनुयायांच्‍या रांगा लागल्या होत्या. चौकात लावण्यात आलेले पुस्‍तक स्टॉल आणि विविध खेळणी विक्रेत्यांची गर्दी आणि हजारो अनुयायांच्या उपस्थितीने संपूर्ण शहर परिसरात चैतन्य संचारले होते. आकाशातून पुष्पवृष्टी झाल्यामुळे वातावरण भारले होते. हजारो पुस्तकांची विक्री झाली.
अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे झेंडे, फलक आणि पताका लावून परिसर सजवण्यात आला आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी‎ लावून विद्युत रोषणाई करण्यात आली.‎ मिरवणुकीसाठी डीजे लावण्यात आला होता. दिवसभरात हजारोपेक्षा अधिक अनुयायांनी डॉ.‎ आंबेडकर यांच्या पुतळ्याला‎ पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.‎ मोरवाडीत स्टेज उभारुन १५ फुट उंचीची मूर्ती सजवली होती. मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा उत्साह ओसांडून वाहत होता. पिंपरीतील आणि दापोडीतील बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात भीमसैनिकांची गर्दी झाली होती. पुस्तक वाचनापासून रक्तदान आणि विविध अनोख्या उपक्रमांनी भीमसैनिक अभिवादन केले. बॅज,‎ चमकी, माथापट्टी, गळ्‍यातील पट्टा, नीळे फेटे यांना तरूणाईकडून‎ मागणी होती. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वात पारंपारिक तारपा नृत्यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात चैतन्य आणले. गीत परिवर्तनाचे हा समाजजागृतीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

ठिकठिकाणी अन्नदान
शहरात ठिकठिकाणी अन्नदानाचे उपक्रम राबविण्यात आले. विविध मित्र मंडळे, संस्था आणि भीम अनुयायांकडून केळी, साबुदाणा खिचडी, लिंबू सरबत, चहा, थंड ताक व पिण्याच्या पाण्याची सेवा आणि भोजनाचे वाटप केले. तसेच रक्तदान शिबिर, गरजू महिलांना साडी वाटप, अनाथाश्रमात भोजनदान असे समाजोपयोगी उपक्रमही शहरात राबवले.

संविधानाची मागणी जास्त
बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अनुयायी व वाचकांनी‎ डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा, विचारांचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या व त्यांच्यावर लिहिलेल्या‎ पुस्तकांचे वाचन करुन त्यांना अभिवादन केले. भाारतीय संविधान ग्रंथाच्या दोनशेपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली.‎ वर्षभरापेक्षा या दिवसाला तिपटीने मागणी असल्याचे नाशिकवरून आलेल्या सागर जराड या विक्रेत्याने सांगितले. भारताची‎ फाळणी, पुणे करार, संविधान सभेतील वादविवाद, बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकांनाही मागणी होती.‎
पिंपरी येथील अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुमारे ४० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com