

सोमाटणे, ता. १७ : यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने आणि धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने पवनमावळातील शेतकऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून ऊस लागवडीचे क्षेत्र कमी केले आहे. बारमाही पीक असलेल्या उसाऐवजी कमी पाण्यात आणि अल्प कालावधीत चांगले उत्पादन मिळवून देणाऱ्या कांदा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. तसेच ज्वारी, हरभरा, गहू, वाटाणा आणि मसूर या पिकांच्या लागवडीतही वाढ होत आहे.
पवना, कासारसाई, आढले, पुसाणे आणि मळवंडी धरणांच्या मुबलक पाण्यामुळे गेल्या अडीच दशकांत पवनमावळ परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. तुलनेने कमी कष्ट, मजुरी आणि औषध फवारणीचा खर्च तसेच चांगला बाजारभाव यामुळे ऊस हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणांतील पाणीसाठा वेगाने घटत आहे.
भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शेतीसाठी पाणी वापरावर निर्बंध येण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ऊस पिकाला पुरेसे पाणी मिळाले नाही, तर उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या कांदा पिकाची लागवड वाढवली आहे.
या बदलाचा परिणाम आगामी वर्षातील ऊस गाळप हंगामावर होण्याची शक्यता आहे. पवनमावळासह तालुक्यातील अनेक भागांत उसाचे क्षेत्र घटत असल्याने पुढील वर्षी ऊस उत्पादनात मोठी घट होऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
याबाबत प्रगतशील शेतकरी सूर्यकांत सोरटे म्हणाले, उसाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. यंदा पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्याने उसाचे क्षेत्र कमी केले आहे. त्याऐवजी कमी कालावधीत उत्पादन मिळवून देणाऱ्या आणि नगदी पीक असलेल्या कांद्याची लागवड करण्याकडे आमचा कल आहे.
PNE26W66347
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.