उद्योग हे प्रगतीचे प्रवेशद्वार, पण सुरक्षा हा पाया
‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिन’ विशेष
पिंपरी, ता. ३ : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी एकही स्वतंत्र अग्निशमन केंद्र नाही. कंपन्यांमधील पेट्रोलियम, रासायनिक, वायू आणि इतर घातक पदार्थांची माहिती अग्निशमन विभागाला बऱ्याचवेळा दिली जात नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास ती हाताळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असते. शिवाय काही कंपन्यांची स्वतंत्र अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. याबाबत फारशी सजगता नसल्याचेही समोर आले आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार मार्च १९६६ रोजी नॅशनल सेफ्टी कौन्सिलची (एनएससी) स्थापना केली. या पार्श्वभूमीवर १९७२ पासून दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा याचे ५५ वे वर्ष आहे. ‘सक्रिय सहभाग, शिक्षण आणि सक्षमीकरण’ ही या वर्षीची संकल्पना आहे.
‘‘शहरालगत चाकण, भोसरी आणि तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र आहे. या क्षेत्रांत अपघातांच्या दररोज छोट्या-मोठ्या घटना घडतात. अशा वेळी सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे कामगार गंभीर किंवा किरकोळ जखमी होत असून काही घटनांमध्ये कामगारांचा मृत्यूही झाला आहे. हे रोखण्यासाठी कारखान्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई) अनिवार्य वापर, सुरक्षा प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणी आणि आपत्कालीन नियमावलीची अंमलबजावणी या मूलभूत नियमांचे पालन केले पाहिजे. उद्योग प्रगतीचे प्रवेशद्वार आहे, परंतु सुरक्षा हा त्याचा खरा पाया आहे,’’ असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
औद्योगिक परिसरातील दुर्घटना (कंसात दिवस)
- भोसरी येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत आठ महिलांचा मृत्यू (२७ ऑगस्ट २००८)
- चिखलीमधील हार्डवेअरच्या कंपनीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू (३० ऑगस्ट २०२३)
- तळवडे येथील स्पार्कल कॅण्डलच्या कंपनीतील स्फोट, आगीत चौदा महिलांचा मृत्यू (८ डिसेंबर २०२३)
या उपायोजना आवश्यक
- कंपन्यांनी ‘इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट’ करणे आवश्यक
- बॉयलर सेफ्टी प्रमाणपत्र
- इंधनाच्या टाक्यांची तपासणी करुन पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशनचे (पेसो) प्रमाणपत्र
- वैद्यकीय विभागाकडून कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी
- कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अग्निशमन उपकरणांचे प्रशिक्षण
- कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने (पीपीई) उपलब्ध करून द्यावेत
कंपन्यांमधील अग्निशमन उपकरणांची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती व्हावी. दर सहा महिन्यांनी फॉर्म-बी सादर करणे आवश्यक आहे. कामगारांना अग्निशमन उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.
- भारत कापसे, विभागीय अग्निशमन अधिकारी, पुणे
औद्योगिक, व्यावसायिक कंपन्यांची दरवर्षी तपासणी करून मनपा कार्यक्षेत्रातील अग्निशमन विभागाकडून ‘अग्निसुरक्षिता पूर्तता प्रमाणपत्र’ घेतले पाहिजे. औद्योगिक परिसर सर्वेक्षणासाठी अग्निशमन विभागाला सोबत घेतले पाहिजे.
- ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची मागणी आम्ही गेल्या १५ वर्षांपासून करत आहोत. यासाठी जागा राखीव आहे. गेल्या वर्षीच्या बैठकीत निविदा निघाल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघू उद्योजक संघटना
कामगारांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा. कंपनीमध्ये काम सुरू करण्यापूर्वी ते वापरत असलेले यंत्र योग्य पद्धतीने सुरू आहे का, हे तपासले पाहिजे. नंतरच काम सुरू केले पाहिजे.
- विश्वास पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा विभाग, ‘फौरशिया इंडिया’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

