गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

श्वानांना मारहाण केल्याने
पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : श्वानांना मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रज्वल कमलेश दुबे (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील सखाराम सावंत व इतर चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी एका श्वानाचे दोन्ही पाय पकडून त्याला हवेत फिरवून रस्त्यावर आपटून जखमी केले. आरोपींनी मोटार भरधाव चालवून रस्त्यालगत उभ्या असलेल्या इतर श्वानांना चिरडण्याचाही प्रयत्न केला.
----------------

क्रिकेट सामन्यावर बेटिंगमुळे
पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : क्रिकेट सामन्यावर बेटिंग सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकला. पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनीतील एका खोलीत ही कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. जयकुमार सुरेश धनवानी (रा. पिंपळे सौदागर), साहिल सुरेंद्र मंगवाणी, विकी जामनदास लोहाना (दोघेही रा. साई चौक रस्ता, पिंपरी), विकी ललवाणी, जितू माकिजा, नीलेश रामरख्यानी आशी आरोपींची नावे आहेत. टी २० विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यावर आरोपी धनवानी, मंगवाणी व लोहाना मोबाईल कॉलद्वारे ललवाणी, माकिजा व रामरख्यानी यांची बोली स्वीकारून बेटिंग घेत होते. या कारवाईत सात मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सहा लाख ५७ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
----------------------------

बंद बँक खात्याचा
धनादेश देऊन फसविले
पिंपरी : बंद केलेल्या बँक खात्याचा धनादेश देऊन मोशीतील बोऱ्हाडेवाडीतील सराफाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी न्यू गणेश ज्वेलर्सच्या गुलाबसिंग गेनसिंग चौहान (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतीश ज्ञानदेव वालसिंगे (रा. जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीच्या दुकानातून सहा लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करून त्यांना धनादेश दिला. मात्र, आरोपीचे बँक खाते बंद असल्याने धनादेश वटला नाही.
-------------------

सांगवीत तरुणावर सुऱ्याने वार
पिंपरी : जुन्या सांगवीतील ममतानगर येथे एका तरुणावर सुऱ्याने वार करून परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रोहित दिगंबर कांबळे (रा. चंद्रमणीनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव, अक्षय ऊर्फ बब्या जावळे, अर्जुन देवकांबळे (सर्व रा. जुनी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी व त्यांचे तीन मित्र गप्पा मारत उभे होते. आरोपी तेथे आले. फिर्यादीचे मित्र रयान याला, तू आम्हाला ओळखतो का, असे त्यांनी विचारले. त्यावर रयानने ओळखत नसल्याचे सांगितले. त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलिसात तक्रार केली तर बघून घेऊ, अशी धमकीही आरोपींनी दिली.
---------------
जादा नफ्याच्या आमिषाने १५ लाखांचा गंडा
पिंपरी : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त नफ्याच्या आमिषाने एका व्यक्तीला १५ लाख ३५ हजार ११७ रुपयांना ऑनलाइन फसविण्यात आले. याप्रकरणी एका व्यक्तीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र गुंतविलेली रक्कम व परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.
---------------------------------------

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. भोसरी एमआयडीसीमध्ये ही कारवाई झाली. बालाजी नंदू शिंदे (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com