डीजेच्या तालावर ईद-ए-मिलादचा भव्य जुलूस

डीजेच्या तालावर ईद-ए-मिलादचा भव्य जुलूस
Published on

पिंपरी, ता. २६ ः पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) शहरात आज मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात भव्य जुलूस काढला. रंगीबेरंगी रोषणाई, पारंपरिक अरबी गीतांच्या तालावर शहरातील शेकडो तरुण आणि अबालवृद्ध या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मुख्य मार्गावरून निघालेल्या या जुलूसमध्ये पांढरे शुभ्र कुर्ते-पायजमे आणि डोक्यावर आकर्षक टोपी घातलेले मुस्लिम बांधव आणि ‘ईद मिलादुन्नबी’चा जयघोष आणि ‘नात’ आणि ‘दुरुद-ओ-सलाम’चे डीजेवरील सूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मिलिंदनगर, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, काळेवाडी, मासुळकर कॉलनी, नेहरूनगर, वाकड, भोसरी आणि निगडी परिसरातील विविध मशिदी व मंडळांचे जुलूस एकत्र येत मुख्य मिरवणुकीत रूपांतरित झाले. मुख्य मिरवणुकीची सुरुवात मिलिंदनगर येथून झाली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे पिंपरी येथील पीएमपीएमएल मैदानावर मिरवणूक पोहोचली. यासोबतच अनेक मंडळांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विचारांवर आधारित संदेश देणारे डिजिटल फलक आणि मक्केच्या प्रतिकृतीचे फिरते देखावे लावले होते. पारंपरिक पोशाख परिधान केलेले मुस्लिम बांधव हातात पवित्र धार्मिक ध्वज घेऊन चालत होते.

पाणी, सरबताची सोय
विविध चौकांमध्ये राजकीय पुढारी, सामाजिक संस्था आणि हिंदू बांधवांनी जुलूसचे स्वागत करून राष्ट्रीय एकात्मता आणि कौमी एकतेचे दर्शन घडवले. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, सरबताची सोय करण्यात आली होती.

पुढाऱ्यांची ‘बॅनरबाजी’
ईद-ए-मिलादनिमित्त पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी आणि सांगवी परिसरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी भव्य ‘बॅनरबाजी’ करत मुस्लिम बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. पिंपरी महावीर चौक, मोरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराळवाडी, निगडी, भोसरी, सांगवी, दापोडी आणि काळेवाडी यांसारख्या मुस्लिम बहुल आणि मुख्य मिरवणुकीच्या (जुलूस) मार्गांवर नेत्यांचे मोठे बॅनर्स झळकले.

चोख पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक बदल
जुलूस शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com