‘स्वच्छ शहर’ मोहिमेसाठीसाठी संयुक्त पथके

‘स्वच्छ शहर’ मोहिमेसाठीसाठी संयुक्त पथके
Published on

पिंपरी, ता. १२ : ‘‘शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध विभागांची संयुक्त पथके तयार केली आहेत. कचरा विलगीकरण, स्वच्छ रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर विशेष भर दिला आहे,’’ अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

‘‘केंद्र सरकारच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ प्रक्रिया सुरू आहे. चालू महिन्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू होणार आहे. सर्वेक्षणात देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातून १०० टक्के कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ असे हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिका काय करणार?
- ओला, सुका, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा वेगळा न करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करणार
- कचरा वेळेवर उचलला जावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण होऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून सतत देखरेख

महापालिकेचे प्रयत्न
- शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि अंतर्गत रस्त्यांवर विशेष स्वच्छता मोहीम
- कचरा कुंडीमुक्त परिसरासाठी विशेष स्वच्छता पथके तैनात
- सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणी-वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर लक्ष
- शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, रॅली आणि जनजागृती कार्यक्रम
- गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरण आणि स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती

‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम
सर्वेक्षणात यावर्षी ‘स्वच्छ शहर जोडी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत महापालिका इतर प्रगत शहरांच्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून त्या शहरात राबविण्याचा प्रयत्न करत आहे.

नागरी अभिप्राय निर्णायक
स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा अभिप्राय शहराच्या क्रमवारीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता ॲप किंवा स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर सकारात्मक अभिप्राय नोंदवावा.

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. कचरा संकलन, विलगीकरण, प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. नागरिकांनी स्वच्छता ॲपवर सकारात्मक अभिप्राय नोंदवून आणि परिसर स्वच्छ ठेवून महापालिकेला सहकार्य करावे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com