

सोमाटणे ग्राम : लेख ६
-----------------
शिक्षणाची प्रेरणादायी वाटचाल
एका छोट्या वर्गापासून आज मोठ्या इमारतीमध्ये रूपांतरित झालेले सोमाटणे, मावळ येथील श्री तुळजाभवानी विद्यालय गावासाठी आदर्श ठरले आहे. गेल्या २५ वर्षांतील शाळेचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. या वाटचालीत सोमाटणे गावातील ग्रामस्थांनी केलेले सहकार्य आणि मदत संस्था कधीच विसरणार नाही, हे मात्र खरे!
- श्री संतोष मेरगळ, उपशिक्षक, तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे, मावळ
श्री तुळजाभवानी विद्यालयाची स्थापना जून १९८७ मध्ये मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी, सांगवी, पुणे २७ या संस्थेमार्फत करण्यात आली. प्रारंभी पुनर्वसन सोमाटणे फाटा येथे असलेली इमारत दोन वर्षे वापरण्यात आली. इयत्ता आठवी, नववी आणि दहावी असे तीन वर्ग सुरू होते. त्यानंतर जून १९८९ मध्ये ग्रामस्थांनी सोमाटणे गावात जिल्हा परिषदेच्या तीन खोल्यांमध्ये जागा उपलब्ध करून दिली. इयत्ता दहावीच्या तीन बॅच गेल्यानंतर मार्च १९९२ मध्ये शाळेला ७५ टक्के अनुदान प्राप्त झाले. मार्च १९९३ मध्ये शाळा शंभर टक्के अनुदानित झाली. संस्थेचे संस्थापक कै. श्री श्यामराव कदम व सचिव श्री एकनाथ ढोरे, श्री भास्कर पाटील साहेब व कै. श्री सोनवणे साहेब यांनी संस्थेच्या मालकीची ११ गुंठे जागा विकत घेऊन तीन खोल्या बांधून दिल्या. त्यावेळी सोमाटणे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी बांधकामासाठी मोठे आर्थिक सहकार्य केले.
शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ
शाळेमध्ये इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीचे वर्ग १९९५ पासून सुरू करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थीसंख्या वाढत गेली. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा, शालेय संरक्षण भिंत, गेट, मुला-मुलींसाठी शौचालय, पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा सोमाटणे गावचे ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून उपलब्ध करून देण्यात आल्या. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. शैक्षणिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ मिळाले.
विद्यालयातून घडले अनेक विद्यार्थी
विद्यालयात सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, काकडे वस्ती आणि शंकरवाडी येथील विद्यार्थी शिक्षण घेऊन डॉक्टर, चार्टर अकाउंटंट, तहसीलदार तसेच पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी झाले. आज सर्व माजी विद्यार्थी उद्योजक होऊन आपल्या विद्यालयाचे नाव लौकिक करत आहेत. विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केल्यामुळे शाळेच्या शैक्षणिक कार्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
तीन मजली भव्य इमारतीची उभारणी
जून २०२२ मध्ये संस्थेची इमारत अपुरी पडू लागल्यामुळे सर्व आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतून संस्थेच्या तीन मजली, सर्व सुविधायुक्त भव्य इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. जून २०२५ मध्ये ही जवळपास एक कोटी ६० लाख रुपयांची इमारत पूर्णत्वास आली.
दहावीचे नवीन केंद्र मंजूर
मार्च २०२६ मध्ये एच.एस.सी. बोर्डाचे नवीन केंद्र मंजूर झाले. नवीन इमारत बांधण्यासाठी शाळेतील उपशिक्षक श्री. संतोष मेरगळ व राजेंद्र मठे यांनी अमाप कष्ट केले. त्यांच्या प्रयत्नांसह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, सदस्य आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान या कामात महत्त्वाचे ठरले.
तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाटचाल
आज पाचवी ते दहावीचे पूर्ण अनुदानित वर्ग असून, विद्यार्थीसंख्या ३०० च्या पुढे गेली आहे. वाढत्या विद्यार्थिसंख्येसोबत शाळेच्या भौतिक सुविधांमध्येही वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी विद्यालयाची वाटचाल सुरू आहे.
सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया
शाळा ही मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. कुटुंबानंतर मुलांचे सामाजिक जीवन खऱ्या अर्थाने शाळेपासून सुरू होते. आजपर्यंत शाळा ही समाजाची एक छोटी प्रतिकृती आहे, असे म्हटले जायचे. ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहे. व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याकरिता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वांत चांगला मार्ग आहे. या दृष्टीने श्री तुळजाभवानी विद्यालयाचा छोट्या वर्गापासून तीन मजली भव्य इमारतीपर्यंत झालेला प्रवास हा केवळ एका शैक्षणिक संस्थेचा प्रवास नसून, ग्रामस्थांच्या एकजुटीचा, सहकार्याचा आणि शिक्षणावरील विश्वासाचा प्रेरणादायी प्रवास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.