महापालिकेच्या सेवेतही कालबाह्य वाहने

महापालिकेच्या सेवेतही कालबाह्य वाहने
Published on: 

पिंपरी, ता. ६ : महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य आणि पर्यावरण विभागाच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ठेकेदारांच्या काही वाहनांना पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र, त्यांची एकत्रित आकडेवारी महापालिकेच्या एकाही विभागाकडे उपलब्ध नाही. निगडीतील कचरा संकलन वाहनाच्या अपघातात पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही वाहनांची स्थिती, चालकांची पात्रता आणि ठेकेदारांवरील देखरेखीचा प्रश्न कायम आहे.

निगडीतील साईनाथनगर येथे १४ सप्टेंबर रोजी कचरा संकलन वाहनाने उभ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीलगत असलेली संस्कृती भागवत बिरादार (वय ५) वाहनाखाली आल्याने तिचा मृत्यू झाला. तपासात परवाना नसलेला मदतनीस वाहन चालवत असल्याचे समोर आले. त्याला वाहन चालवू दिल्याप्रकरणी चालकासह दोघांना पोलिसांनी अटक केली. अपघातग्रस्त वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रही (पीयूसी) मुदतबाह्य होते.
घटनेनंतर ठेकेदारांना वाहनांची दुरुस्ती आणि वैध कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, किती वाहनांची दुरुस्ती झाली, किती वाहनांची कागदपत्रे अद्ययावत झाली आणि किती वाहने सेवेतून थांबविली, याचा स्पष्ट तपशील समोर आलेला नाही. उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य आणि पर्यावरण विभागातील ठेकेदारांच्या वाहनांची संख्या, नोंदणी वर्ष आणि देखभालीच्या नोंदींचा एकत्रित आढावा आवश्यक आहे. वाहनांची मालकी ठेकेदारांकडे असली, तरी वापर सार्वजनिक सेवांसाठी होत असल्याने संबंधित विभागांची जबाबदारी टाळता येणार नाही. करारातील वाहनांच्या वयोमर्यादेच्या अटींचे पालन आणि प्रत्यक्ष चालकांची पडताळणीही महत्त्वाची आहे.


३४ वाहनांमध्ये नियमभंग
आरटीओच्या दोन महिन्यांतील तपासणीत ३४ कचरा वाहतूक वाहनांमध्ये नियमभंग आढळला. त्यांच्याकडून सुमारे एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मुदतबाह्य योग्यता प्रमाणपत्रे, अपूर्ण कागदपत्रे, चुकीच्या क्रमांक पाट्या आणि असुरक्षित अथवा जादा भाराने कचरा वाहतूक अशा त्रुटी आढळल्या.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये ठेकेदारांची वाहने वापरली जातात. वाहने चांगल्या स्थितीत ठेवणे, सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे तसेच चालकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत ठेकेदारांना वारंवार सूचना देण्यात येतात.
-कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com