शिधापत्रिका कार्यालयात नागरिकांचे हेलपाटे

शिधापत्रिका कार्यालयात नागरिकांचे हेलपाटे
Published on: 

पिंपरी, ता. १० : शिधापत्रिकांशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार शिधापत्रिका कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. धान्यवाटपातील अडचणी, शिधापत्रिकांमधील दुरुस्ती आणि अन्य प्रलंबित कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्‍यान, निवडणुकीची कामे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील शिधापत्रिकाधारकांना विविध कामांसाठी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागते. मात्र, अनेकदा कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना पुन्हा कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहेत. विशेषतः कामानिमित्त सुटी घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना काम न होताच परतावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. सध्‍या सर्व कामे ऑनलाईन होत असली तरी, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे ती कामे खोळंबतात. त्‍यामुळे या कार्यालयात यावे लागते. तसेच, शिधापत्रिका दुरुस्‍ती, दुबार यासह अन्‍य कामांसाठी नागरिकांना कार्यालयात यावे लागते. मात्र, या ठिकाणी अधिकारी नसल्‍याने त्‍यांना कर्मचारी पुन्‍हा माघारी पाठवतात. येथे पिंपरी व चिंचवड या दोन विभागांसाठी दोन स्‍वतंत्र अधिकारी आहेत. मात्र, त्‍यांना निवडणुकीचे काम असल्‍याने या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसून येते.
धान्यवाटपाबाबतच्या तक्रारींसह नवीन शिधापत्रिका मिळविणे, नावात दुरुस्ती करणे आणि अन्य कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यास तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिधापत्रिका कार्यालयातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अधिकारी वेळेत उपस्थित राहावेत आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----

---

आठवड्यापासून ई पॉस मशिन बंद
धान्‍य वाटपासाठी असलेली ई पॉस मशिन तांत्रिक कारणांनी बंद असल्‍याने वाटप करता येत नाही. सणासुदीच्या काळात मशिन बंद असल्‍याने लाभार्थ्यांना पुन्‍हा माघारी जावे लागत आहे. स्‍थानिक दुकानदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही सेवा पूर्ववत झाली नाही.
---
दुष्‍काळी भागातून आलेल्या नागरिकांकडून धान्‍यासाठी विचारणा केली जात आहे. ही संख्‍या वाढत आहे. दुसरीकडे, ई पॉस मशिन बंद असल्‍याने धान्‍य वाटपात देखील अडचणी येत आहेत. त्‍यामुळे लाभार्थ्यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते.
- विक्रम छाजेड, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार

---
धान्‍य वेळेवर मिळत नाही. त्‍यातच वेगवेगळ्या कारणांनी वाटप बंद केले जाते. दुकानदार नीट सांगत नाही. त्‍यामुळे दुकानावर रोज जाऊन चौकशी करावी लागते.
- पार्वती तिडके, पाटीलनगर, चिखली

---
ई पॉस मशिनमध्‍ये काही डाटा समाविष्‍ट केला जात आहे. त्‍यामुळे काही तांत्रिक अडचण येते. मात्र, मशिन कोठेही बंद नाही. इतर वाटप सुरू आहे.
- प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com