केवळ चिखलफेक नको, विकासावरही बोला
पिंपरी, ता. ७ : महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत शहराच्या विकासावर बोलण्याऐवजी केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतराचे सत्र सुरू आहे. शिवाय, आताही प्रचारात टीकाच केली जात आहे. त्यामुळे ‘एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा पिंपरी चिंचवडच्या विकासावर बोला. सुविधा देणाऱ्यांच्याच मागे मतदार उभे राहतील,’ अशी भूमिका शहरातील आयटीयन्सनी घेतली आहे.
पिंपरी चिंचवडला ‘आयटी हब’ अशी नवी ओळख मिळाली आहे. आयटी क्षेत्र वाढल्याने शहरात अभियंत्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे नागरीकरण वाढले आहे. मात्र, उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांची अजूनही वाणवा आहे. यात प्रामुख्याने रावेत, वाकड, पुनावळे, ताथवडे, मोशी, किवळे, वाकड, चऱ्होली, चिखली, डुडुळगाव या भागांत मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी राहतात. हिंजवडी, तळवडे आणि बाणेर- बालेवाडी आयटी पार्क जवळ असल्याने मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, महापालिकेत समाविष्ट होऊनही या भागामध्ये रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, पदपथ या सुविधांची वाणवा असल्याचे आयटीयन्सचे म्हणणे आहे.
हिंजवडीला जोडणाऱ्या उपनगरांचा विकास कधी?
पिंपरी चिंचवडमधून हिंजवडीला जाणाऱ्या परिसराला रस्ते, धूळ, वाहतूक यांसारख्या असुविधांचे ग्रहण लागले आहे. याचा त्रास रोज शहराच्या विविध भागांतून जाणाऱ्यांना सहन करावा लागतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांमध्ये येथील परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. महापालिकेकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वर्षातील कमीत कमी सहा महिने येथील सोसायट्यांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. तसेच, या भागात मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचेही काम सुरू आहे. परिणामी, अवजड वाहनांची वाहतूक कायम असते. त्यामुळे होणारे अपघात ही मोठी समस्या आहे.
सध्या केवळ सत्तेचे राजकारण सुरू आहे. मात्र, आयटीयन्स रस्ते व वाहतूक कोंडी या दोन समस्यांना वर्षभर तोंड देत आहेत. कोणीही यावर बोलताना दिसत नाही. आम्ही राहतो तो प्रभाग महापालिकेत समाविष्ट होऊन पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, तरीही विकास झालेला नाही. हवा प्रदूषण, पाण्याचा तुटवडा, खराब रस्ते या समस्या कायमच्याच आहेत.
- अरुण पाटोळे, आयटी कर्मचारी, वाकड
सध्या निवडणुकीच्या काळात दोन पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. एकमेकांवर टीका करून आमचे प्रश्न सुटणार आहेत का? आम्हाला ज्या सुविधा मिळत नाहीत, त्यावर कोणीही बोलत नाही. आयटी पार्क जवळ असल्याने येथे इमारतीही मोठ्या प्रमाणावर झाल्या. मात्र त्या इमारतींना परवानगी देताना तिथे सुनियोजित रस्ते, सांडपाण्याची व्सवस्था, पाणीपुरवठा आहे का या बाबी प्रशासनाकडून पाहिल्या गेल्या नाहीत.
- प्रशांत पंडित, सचिव, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज
मी ज्या परिसरात राहतो, तिथे बांधकांमांचे प्रमाण अधिक असल्याने अवजड वाहतूक जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे रस्ते खराब आहेत. ही परिस्थिती हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरही आहे. येथील कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण होण्यासोबतच भूमकर चौक, वाकड चौकाचा विस्तार होणेही गरजेचे आहे.
- प्रवीण महाडिक, मोशी
PNE26V83359
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

