

पिंपरी, ता. १२ ः राज्यात प्लॅस्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष अधिसूचना काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा वास्तवात न उतरल्याने यंदाही गणेशोत्सवानिमित्त बाजारात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. त्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली असून अनेक फुल उत्पादक आणि विक्रेत्यांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचनेबरोबरच महापालिकांना त्याबाबत बाजारपेठांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्याचेही १८ मार्च २०२६ रोजी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात जाहीर केले होते. पण, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही. प्लॅस्टिकच्या फुलांमुळे नैसर्गिक फुलशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे त्या फुलांवर बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी विधिमंडळात केली होती. तर सदस्य शशिकांत शिंदे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनीही उपप्रश्न उपस्थित केले होते.
स्वतःच्याच घोषणेचा विसर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते की, राज्यात प्लॅस्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या विद्यमान अधिसूचनेअंतर्गतच विशेष अधिसूचना काढून प्लॅस्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. प्लॅस्टिक फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटिसा बजावल्या जातील. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
राज्यात लाखो शेतकरी फूलशेती करत आहेत. लाखोंचे कर्ज डोक्यावर घेऊन शेतकरी फूलशेती करतो. ग्रीनहाऊस आणि पॉलिहाऊसमध्ये फूल उत्पादन घेत आहे. पण, बाजारात प्लॅस्टिक फुलांची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुल विक्रीवर परिणाम होत आहे. फुल उत्पादक अडचणीत येत आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासनाने योग्य निर्णय घेतला पाहिजे.
- सदाभाऊ खोत, आमदार
राज्य शासनाकडून फूल उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. पण, दुसऱ्या बाजूला प्लॅस्टिक फूल विक्री बंदीबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे.
- ज्ञानेश्वर ठाकर, उपाध्यक्ष, पवना फुल उत्पादक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.