दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा घोषणांसह वाजत-गाजत लाडक्या गणरायाला मंगळवारी (ता. १५) अत्यंत उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. चिंचवड येथील मोरया घाटासह शहरातील विविध घाटांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जनासाठी भाविकांची विसर्जन हौदांवर गर्दी पाहायला मिळाली.
घरोघरी सोमवारी (ता. १४) गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले होते. भाविकांनी गणरायाची दीड दिवस मनोभावे पूजा केली. भक्तांच्या घरी दीड दिवसांच्या मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी घरगुती आणि छोट्या मंडळांच्या गणरायाला उत्तरपूजा करुन उत्साही वातावरणात निरोप दिला. पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नदी प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था केली होती. विसर्जनस्थळी आरती, जयजयकारांचा उद्घोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. लाडक्या गणरायास निरोप देताना भाविक गहिवरले होते. गणेशोत्सवात आगमनाप्रमाणेच विसर्जनासाठीही प्रशासनाकडून पुरेपूर तयारी करण्यात आली होती. पालिकेकडून २७ विसर्जन घाटांवर पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवी संस्था आदींचीही त्यांना साथ लाभली.
------------
या ठिकाणी सुविधा
पिंपरीतील सुभाष घाट, अहिल्यादेवी होळकर घाट, चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, सांगवीतील वेताळ महाराज घाट, वाकड गावठाण घाट, मोशी घाट, चिखली घाट, चऱ्होली, बोपखेल येथील घाट, निगडी व आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांसाठी गणेश तलाव, तर रावेत येथील भाविकांसाठी बास्केट पुलाजवळ पालिकेतर्फे विसर्जन हौद ठेवण्यात आले आहेत. महापालिकेतर्फे प्रत्येक घाटावर कृत्रिम हौददेखील बांधण्यात आले आहेत.
-----

Marathi News Esakal
www.esakal.com