महापालिकेचा उत्पन्नवाढीवर भर
पिंपरी, ता. ४ ः महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. यात जाहिरात फलक भाडेआकारणी, व्यावसायिकांची नोंदणी, दुकानांची ऑनलाइन प्रणाली आणि मिळकतकर आकारणीत सुसूत्रता आदींचा समावेश आहे. त्यांवर बुधवारी स्थायी समिती सभेत चर्चा झाली, अशी माहिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतरची स्थायी समितीची तिसरी सभा बुधवारी झाली. मात्र, पहिली सभा स्थायी समिती अध्यक्ष निवड, दुसरी सभा अर्थसंकल्प सादरीकरणाची होती. विविध विषयांवर चर्चा, विविध प्रकल्प सुचविण्यासाठीची आणि अर्थसंकल्पीय तहकूब अशा दोन सभा बुधवारी (ता. ४) झाल्या. त्याबाबत अध्यक्ष बारणे यांनी माहिती दिली. नियमित साप्ताहिक बैठकीच्या विषय पत्रिकेवर सात विषय होते. त्यापैकी केवळ मुख्य लेखा परीक्षण विभागातील २४ कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी आणि मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या साडेसात लाख रुपये खर्च या दोनच विषयांना मंजुरी देण्यात आली. कासारवाडीतील दोन डीपी रस्ते, नद्यांच्या तपासणी, दोन ठिकाणच्या जलवाहिन्यांचा वाढीव खर्च असे विषय तहकूब ठेवले आहेत.
अर्थसंकल्पाला उपसूचना नाही
अर्थसंकल्पीय स्थायी समितीची सभा बुधवारी (ता. ४) तहकूब झाली. त्यात उपसूचना मांडून नवीन प्रकल्प सुचविणे, प्रशासकीय काळात तयार केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. याशिवाय, नियमित साप्ताहिक कार्यपत्रिकेतील विविध विषयांना मंजुरी देणेही आवश्यक होते. मात्र, किरकोळ दोन विषय मंजूर करून अन्य विषयांसह अर्थसंकल्पीय सभाही आठवडाभर तहकूब ठेवण्यात आली. त्यामुळे स्थायी सदस्यांंसमोर शहरासाठी नवीन प्रकल्प सुचवायला विषय नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सभापतींनीही, जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे, असे नमूद करून सभा तहकूब केल्याचे सांगितले. महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे शनिवारी (ता. २८) सादर केला. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी केल्यानंतर बारणे यांनी बुधवारपर्यंत (ता. ४) सभा तहकूब केली होती. त्यांसह नियमित साप्ताहिक बैठकही बुधवारी झाली. मात्र, त्यात अर्थसंकल्पावर काहीही चर्चा झाली नाही. ती सभा येत्या बुधवारपर्यंत (ता. ११) तहकूब झाली.
उत्पन्नवाढीसाठी चर्चा
१) जाहिरात फलकांच्या (होर्डिंग) भाडेआकारणीत शहराच्या रचनेनुसार अ, ब, क आणि ड अशा वर्गवारीत बदल करून केवळ दोनच विभाग करण्यात आले. जाहिरात दरामध्ये फार फरक नसावा
२) व्यावसायिकांची नोंदणी अत्यावश्यक, २०१६ पासून कोणत्याही व्यावसायिकाची स्वतंत्र नोंदणी नसल्याने शहरातील संख्या केवळ दोन हजार, दुकानाच्या आकारानुसार नोंदणी शुक्ल आकारले जाणार, ते केवळ चारशे ते पाचशे रुपये असेल.
३) कोणतेही दुकान ऑनलाइन दिसावे, त्याची जाहिरात दिसावी, त्याचे ठिकाण नागरिकांना कळावे, याची व्यवस्था होणार. याशिवाय, मांस विक्रीच्या दुकानांच्या रचनेत बदल होणार, उघड्यावर किंवा मोकळ्या जागेत मांस विक्री किंवा कत्तल केलेल्या प्राण्याचे मांस दिसणार नाही. अशी दुकाने झाकली जातील.
४) मिळकतकर आकारणी रचनेत बदल होणार. उदाहरणार्थ, वाकडसारख्या विकसित भागात तुलनेने अविकसित तळवडे भागात मिळकतकर आकारणी दर जास्त आहे. यामध्ये सुधारणा होणार
---
महापालिकेच्या ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही, याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. अत्यावश्यक नसलेली नवीन कामे तूर्तास थांबवून केवळ गरजेच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या सभेत प्रलंबित राहिलेल्या विषयांवर आणि विविध उपसूचनांवर पुढील तहकूब सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोणत्या विभागाने किती कामे केली आणि कोणती प्रलंबित ठेवली, याचा ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ही संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविला आहे.
- अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

