हवा, जल प्रदूषणाची समस्या गंभीर
पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये हवा, जल प्रदूषणाचे प्रमाण गंभीर स्वरुपात वाढले आहे. श्वास घेणेही कठीण व्हावे, इतपत हवेची गुणवत्ता खालावली आहे. या स्थितीवर ‘सकाळ’ने आवाज उठवत ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्त मालिकेद्वारे सद्यस्थिती मांडली. याबाबत वाचकांनीही आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे मांडत प्रदूषण रोखण्यासाठी जागरूकता आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. औद्योगिक धूर, बांधकामातील धूळ, तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता खालावत आहे. तसेच, पवना नदी व इंद्रायणी नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, कचरा व औद्योगिक रसायने सोडली जात असल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पर्यावरणास तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
- प्रशांत शिगवण, चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये अनियंत्रित हवा प्रदूषण होत आहे. रावेत, पुनावळे भागांत धुळीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांची धूळ आणि वाढती वाहनसंख्या यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अस्तित्व दिसत नाही. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा रुग्ण सर्वाधिक धोक्यात आहेत. प्रशासनाकडून त्वरित व कायमची उपाययोजना व्हावी.
- प्रमोद दुर्गुळे, रावेत.
वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधून उडणारी धूळ तसेच झाडतोड ही या प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. वाहनांच्या धुरामुळे हवेत सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. शहरांत हवा शुद्ध ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरणे, वृक्षलागवड, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्रदूषणकारी उद्योगांवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ हवा ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याने सर्वांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- एक नागरिक
शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच करत नाही. त्यामुळे हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार झाला. लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- अनिल लोखंडे, निगडी
‘सकाळ’ने इंद्रायणी नदी प्रदूषण, वाहतूक व्यवस्था तसेच हवा प्रदूषण हा विषय ताकदीने लावून धरला या बद्दल अभिनंदन. ही खूप मोठी समस्या असून, शहरात राहणंच अवघड झाले आहे.
- रामचंद्र दिवेकर, चोवीसावाडी, चऱ्होली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

