क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवूनही रुग्णसंख्या घटेना

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवूनही रुग्णसंख्या घटेना

Published on

पिंपरी, ता. ६ ः शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे. तरीही रुग्णसंख्या घटत नसल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी तब्बल दोन ते तीन हजार नागरिकांना क्षयरोगाची लागण होत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम खरोखरच प्रभावीरित्या राबवला जात आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत या कार्यक्रमांतर्गत लवकर निदान, व्यापक तपासणी, प्रतिबंधात्मक उपचार आणि सामुदायिक सहभाग अशा विविध पातळ्यांवर काम होत आहे. तरिही क्षयरुग्ण वाढतच आहेत. यावर्षीही केवळ दोन महिन्यांत ४२८ क्षयरोग रुग्णांचे निदान झाले आहे.

आकडेवारी
वर्ष सरकारी रुग्णालये खासगी रुग्णालय एकूण
२०२० ११२७ ९४४ २०७१
२०२१ १४२१ ११०९ २५३०
२०२२ १७३५ ११६७ २९०२
२०२३ १७३३ ११६५ २८९८
२०२४ २१७६ ११९४ ३३७०
२०२५ १९९७ ११७३ ३१३०
फेब्रु. २०२६ २९३ १३५ ४२८

काय आहे क्षयरोग
क्षयरोग हा जिवाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ नावाच्या जिवाणूंमुळे होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते, तेव्हा हवेतील सूक्ष्म थेंबांद्वारे हे जिवाणू पसरतात. लवकर निदान झाल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी भारत सरकारकडून रुग्ण शोधण्यापासून उपचार करण्यापर्यंत विविध टप्प्यांचा समावेश आहे. शहरात आढळलेले ९० टक्के रुग्ण बरे होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या आजाराचा शहरातील मृत्यूदर तीन टक्के असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

क्षयरोगाची लक्षणे
- जास्त काळ टिकणारा खोकला
- थुंकीतून रक्त पडणे
- संध्याकाळी ताप येणे आणि रात्री घाम येणे
- वजन कमी होणे, भूक मंदावणे
- सतत थकवा जाणवणे आणि छातीत दुखणे
---
क्षयरोगाचे लवकर निदान व्हावे यासाठी आम्ही महापालिकेच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये याची तपासणी मोफत करत आहोत. रुग्णाला मोफत उपचारही दिले जात आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निक्षय पोर्टलद्वारे रुग्णांची नोंदणी व उपचारांची माहिती संकलित केली जाते. निक्षय पोषण योजनेतून क्षयरुग्णांना सकस आहारासाठी दरमहा एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याशिवाय शहरातील अनेक दानशूर व्यक्ती या रुग्णांना रेशनही पुरवत आहेत.
- बाळासाहेब होडगार, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी, चिंचवड महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com