‘पीसीएमसी सारथी’ ॲपचे सारथ्य होईना

‘पीसीएमसी सारथी’ ॲपचे सारथ्य होईना

Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ ः महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाइन पोर्टलवर संपर्क साधल्यास पाच ते दहा मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते; तथापि अनेक वेळा कोणताही प्रतिनिधी कॉल स्वीकारत नाही किंवा समाधानकारक प्रतिसाद देत नाही. याशिवाय मोबाईल सारथी ॲप वर ‘इन्टर्नल सर्व्हर एरर’ असा संदेश येतो, अशा तांत्रिक कारणांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ॲप बंद असल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी तक्रारी कुठे कराव्यात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ॲप चालत नाही, हेल्पलाइनवर प्रतिसाद नाही, टोकन तयार होत नाही. विनाकारण वेळ वाया जातो, मग कामे सोडून प्रत्यक्ष कार्यालयात येणे अपेक्षित आहे का, अशा शब्दांत शेकडो नागरिक संताप व्यक्त करत आहेत. नागरिकांना नागरी सेवा मिळवण्यासाठी, मदत करण्यासाठी महापालिकेने ‘पीसीएमसी सारथी’ नावाचे हेल्पलाइन पोर्टल तयार केले आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात कार्यक्षम पद्धतीने ‘सारथी हेल्पलाइन’ प्रणाली सुरू करण्यात आली होती. परदेशी यांच्या कार्यकाळात ज्या कार्यक्षम, उत्तरदायी व नागरिकाभिमुख पद्धतीने ही प्रणाली कार्यरत होती, त्या तुलनेत सध्या अंमलबजावणी दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नियमितपणे नोंदविलेल्या तक्रारींचे सात दिवसांत निराकरण होणे अपेक्षित असताना, अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही न करता तक्रारी परस्पर बंद केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्‍वास डळमळीत होत असून स्मार्ट सिटी संकल्पनेच्या उद्दिष्टांनाही बाधा पोहोचत आहे.

प्रभागांची मूलभूत माहिती नाही
हेल्पलाइनवरील प्रतिनिधींना स्थानिक भाग, विभाग व प्रभागांची मूलभूत माहिती नसल्याचे वारंवार दिसते. फोन करणाऱ्या नागरिकालाच संबंधित ठिकाण कोणत्या प्रभागात येते, हे विचारले जाते. पिंपरीतील नागरिकाने निगडी भागातील तक्रार नोंदविताना त्या ठिकाणाचा प्रभाग क्रमांक माहीत असणे अपेक्षित धरणे ही अवास्तव मागणी आहे. सर्व नागरिकांकडे सर्व प्रभागांची माहिती असणे शक्य नाही, अशा तक्रारी अनेकांनी मांडल्या.

अधिकृत टोकन तयार होत नाही
ई-मेलद्वारे हेल्पलाइनवर तक्रारी व सूचना पाठवूनही त्यावर कोणतेही अधिकृत टोकन तयार होत नाही. त्यामुळे तक्रार नोंद झाली आहे की नाही, याबाबत नागरिक संभ्रमात राहतात. अनेक प्रकरणांमध्ये सात-सात दिवस उलटून गेले तरी तक्रारीचे कोणतेही निराकरण होत नाही. काही वेळा तर कोणतीही पूर्वसूचना न देता तक्रारी परस्पर बंद केल्या जातात, ही बाब अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे.

असाही अनुभव
शरद सोनवणे यांनी पुन्हा एकदा सारथी हेल्पलाइनवर फोन करून स्पाईन रोड परिसरातील वाहतूक सिग्नल बंद असल्याबाबत माहिती दिली. मात्र, हेल्पलाइनवर तक्रारही व्यवस्थित ऐकून घेतली गेली नाही, असा अनुभव त्यांना आला.
---
सारथी ॲप व हेल्पलाइन प्रणाली तातडीने सुरळीत करून, तक्रार नोंदणी व निराकरण प्रक्रियेत पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात यावेत.
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरील सारथी ॲप संदर्भातील नागरिकांचे रिव्ह्यू एकदा तरी वाचण्याचे निर्देश द्यावेत. त्यामुळे प्रत्यक्षात हे ॲप कसे (न चालता) कार्यरत आहे, याची वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येईल.
- शरद सोनवणे, चिखली
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com