गुन्हे वृत्त
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी ः मुळशी तालुक्यातील माण येथे गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रमेश आहेरकर, महिला आरोपी, वेदांत आहेरकर, आदित्य आहेरकर (रा. शुभारंभ रेसिडेन्सी, माण, मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शेअर मार्केट तसेच भिशीमध्ये दरमहा ४ ते ५ टक्के जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादींचे ५७ लाख ६ हजार रुपये आणि इतर गुंतवणूकदारांचे ३ कोटी ५९ लाख १४ हजार ८९२ रुपये असे एकूण ४ कोटी १६ लाख २० हजार ८९२ रुपये जमा केले. कोणतीही रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
------------
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकास अटक
हिंजवडी येथील एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई करत एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. ६) रात्री करण्यात आली.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार निलम बुचडे यांनी फिर्याद दिली असता वासुदेवन पिल्लेय (वय ४१, पाषाण रस्ता, पुणे) या स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली. आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.
-----------
महाविद्यालयीन तरुणाला मारहाण
बावधन परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणांना फ्लेम युनिव्हर्सिटी समोरील गौरव फूड कोर्ट, लवळे येथे अडवून काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली.
भुवन आरका (वय १९, रा. फ्लेम युनिव्हर्सिटी एल ब्लॉक, लवळे. मूळ- हैद्राबाद) या विद्यार्थ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयेश शितोळे, श्रीनाथ शितोळे, सिद्धार्थ शितोळे आणि अभिषेक सातव (रा. सर्व लवळे, मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र पेट्रोल भरून विद्यापीठात परतत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून दोघांना शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
----------
दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
तळेगाव-चाकण रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. इंदोरी येथील हॉटेल शिवप्रसाद समोर घडली.
मुक्ताबाई घरदाळे (वय ५२, रा. वाघजाईनगर, खराबवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रोहित गायकवाड (वय २७, रा. खराबवाडी, खेड. मूळ- जामखेड) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी त्यांची मावशी मुक्ताबाई घरदाळे यांना दुचाकीवरून घेऊन जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या चालकाने अविचाराने गाडी चालवून त्यांच्या धडक दिली. या अपघातात मुक्ताबाई यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार आहे.
----------
दोन वाहनांच्या धडकेत चालक जखमी
चाकण परिसरातील रोहकल रोडवरील क्रेशर पॉईंटसमोर दोन वाहनांची धडक होऊन एका चालकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. रमेश व्यवहारे (वय २५, रा. सहारा सिटी, चाकण. मूळ- छत्रपती संभाजीनगर) या जखमी चालकाने फिर्याद दिली आहे. राहुल जाधव (वय ३३, रा. राक्षेवाडी, चाकण) असे आरोपी चालकाचे नाव आहे. फिर्यादी त्यांच्या वाहनाने चाकणकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपने त्यांना धडक दिली. या धडकेत फिर्यादींच्या गाडीचे नुकसान झाले असून त्यांच्या उजव्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.
-------------
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक गुंड बंदी आदेशाचे उल्लंघन करून चिंचवड येथील खदानीजवळ शस्त्र बाळगताना पोलिसांना सापडला. पोलीस शिपाई नंदलाल राऊत यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश महानवर (वय २५, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीला ऑक्टोबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला आणि लोखंडी कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने शंकरनगर चिंचवड येथील खदानीजवळ आला. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.
----------
शिरगाव मध्ये दारूभट्टीवर छापा
शिरगाव येथील पवना नदीच्या पात्राजवळ अवैध दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचे रसायन जप्त केले. पोलीस शिपाई दिलीप राठोड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरगाव येथील ४६ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीकाठी झाडाझुडूपांमध्ये आरोपी महिलेने बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी छापा टाकून हे सर्व साहित्य जप्त केले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

