प्रशासनाने जागे होऊन नियोजन करावे

प्रशासनाने जागे होऊन नियोजन करावे

Published on

पिंपरी, ता. ९ : शहर आणि चाकण परिसरात विविध कारणांनी होत असलेल्या वाहतूक कोंडीवर रुंदीकरण रखडले, नित्यकोंडीने वेढले’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. जनतेच्या मनात खदखदणाऱ्या एका प्रश्‍नाला ‘सकाळ’ने वाचा फोडली. यावर भोसरी, चाकण, नाशिक फाटा ते चांडोली फाटा येथील त्रस्त नागरीकांनी ‘सकाळ’’चे आभार मानत परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘‘चाकण परिसरात नाशिक महामार्ग सतत वाहतुकीत बुडालेला असतो. त्याबद्दल या परिसरातील लोक गेली २० वर्षे आवाज उठवत आहेत. परंतु सहानुभूतीने कोणीच विचार करीत नाही. चाकण आणि परिसरामध्ये आशिया खंडातील एक मोठी कारखानदारी विस्तारली आहे. नाशिक फाट्यापासून खेडपर्यंत मंजूर झालेल्या उन्नत महामार्गाचा पाठपुरावा करून ती योजना प्रत्यक्षात आणावी. हे काम झाल्यास सर्वजण ‘सकाळ’चे नेहमी ऋणी राहतील, कारण राजकीय लोकांनी या भागात काम करण्याची जबाबदारी नाकारलेली दिसत आहे,’’ अशी मते वाचकांनी व्यक्त केली आहेत. काही वाचकांनी स्वयंशिस्तीचा मुद्दाही अधोरेखित केला आहे.
------------------------------
निवडक प्रतिक्रिया अशा ः

कोंडीमुळे चाकण आणि परिसरात वाढलेली कारखानदारी दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा परिसरातील दहा गावांमधील शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे. याठिकाणी औद्योगिक शेड, खोल्या, मोकळ्या जागा भाड्याने दिल्या जातात. अनेक छोटे-मोठे उद्योग कारखानदारीवर अवलंबून आहेत. त्यांना सुद्धा याचा फटका बसेल. परिणामी शासनाचे महसुलाचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे कोंडीची समस्या सोडवावी, अशी विनंती या विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे नेते, राजकीय पदाधिकारी व सरकारी अधिकाऱ्यांना आहे.
- तुकाराम कंडगे, चाकण

नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) मार्गावरील वाढत्या कोंडीवर अंतिम उपाय म्हणून उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय झाला आहे, पण नाशिकफाटा ते राजगुरुनगर रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत प्रशासन जणू झोपले आहे. त्यांना ‘सकाळ’ने लवकर जागे करावे.
- चंदुलाल पोकर, राजगुरुनगर

‘सकाळ’ने सध्याच्या सर्वाधिक गंभीर समस्येला वाचा फोडली. याआधी प्रदूषणाच्या समस्येबद्दलही ‘सकाळ’अभ्यासपूर्ण प्रबोधन केले होते. खरे तर उड्डाणपूल होईल तेव्हा होईल, पण सेवा रस्ते मोकळे केले, तरी बराच फरक पडेल. अतिक्रमण काढले, पण त्याचा उपयोग नाही केला गेला. साईनाथ हॉस्पिटलजवळील सेवा रस्ता लगेच होऊ शकतो. प्रदर्शन केंद्रापासून वाहने उलट्या दिशेने येतात. त्यामुळे तेथे सेवा रस्ता हवाच. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील पथावर गर्दी करणारे पथारीवाले गर्दी आणि मजूर अड्डा यावर उपाय शोधायला हवा. पोलीस तेथे बॅरिकेड्स लावून तपासणीच्या नावाखाली आणखी गर्दी करतात. त्यांना वाहतुकीपेक्षा ‘वसुली’ महत्त्वाची वाटते. वाहन चालक, वाहतूक पोलीस आणि सरकार यांनी आपापली कर्तव्ये नीट पार पाडली तर यावर नक्की मार्ग निघेल.
- प्रा. दिगंबर ढोकले, भोसरी

नाशिक फाटा ते चांडोली फाटा येथे वाहतुकीची परिस्थिती खूप भयानक आहे. महामार्गाचा हा टप्पा अत्यंत वर्दळीचा आहे. विशेषतः मोशी ते चाकण पट्ट्यात प्रचंड कोंडी होते. चाकण जंक्शनजवळील अरुंद रस्ते आणि औद्योगिक वाहनांच्या संख्येमुळे या मार्गावर अनेक तास कोंडी असते. ज्यावर उपाययोजना म्हणून सहा पदरीकरण व उन्नत मार्गाचे काम प्रस्तावित आहे. प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन करावे.
- लक्ष्मण नाणेकर, नाशिक फाटा

दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे यासाठी त्रिस्तरीय रस्ते बनवावे लागतील! उड्डाणपूल वेगळे आणि ही रस्त्याची संकल्पना वेगळी! २०-२० किलोमीटरचे किंवा त्याहून जास्त लांबीचे रस्ते बनवावे लागतील! इमारती उंच उंच होत आहेत, पण रस्त्याची रुंदी मात्र अनेक कारणांमुळे वाढत नाही. खालचा रस्ता सेवा रस्ता म्हणून वापरता येईल. वरचे दोन रस्ते जाण्या-येण्यासाठी वापरता येतील. यावर सर्व पातळ्यांवर विचार व्हावा.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड

कोंडीच्या वेळेत संपूर्ण मालवाहतूक (ट्रकपासून छोटे टेम्पो) बंद ठेवणे, मुख्य रस्त्याला पर्यायी अंतर्गत रस्ते करणे, पर्यायी वाहतूक व्यवस्था (मेट्रो ई) यापैकी जे शक्य आहे ते करावे. ठिकठिकाणी कॅमेरे लावून दोन मार्गिकांमध्ये घुसणारे रिक्षावाले, दुचाकी व चार चाकी वाहनांवर कारवाई करावी. खरे तर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे स्वयं शिस्त. डोके शांत ठेवून आपल्या मार्गिकेमध्येच गाडी रांगेत ठेवावी. थोडा उशीर होइल, पण कोंडीत अडकून पडणार नाही. इथल्या प्रत्येक सिग्नलवर मार्गिकेमध्ये गाड्या थांबल्या असताना जागा दिसली की रिक्षावाले, दुचाकीवाले हमखास घुसतात. उजवीकडे वळायचे असले तरी डाव्या बाजूला थांबतात आणि सिग्नल सुरू झाला कि मागच्या गाड्यांचा विचार न करता कट मारून जातात.
- संजीव नरगुंद, चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com