स्वीकृत सदस्यत्वाचा तिढा कायम

स्वीकृत सदस्यत्वाचा तिढा कायम

Published on

पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड महापालिकेत संख्याबळानुसार दहा नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. यामध्ये भाजपचे सात आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य असतील. राष्ट्रवादीने चार मार्च रोजीच आयुक्तांकडे नावांची यादी दिली असून त्यांचा समावेश शुक्रवारी (ता. १३) होणाऱ्या सर्वसभेतील कार्यपत्रिकेत आली आहेत. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नावांवर शिक्कामोर्तब होण्याचा तिढा कायम आहे. पक्षाच्या प्रदेश समितीकडून शुक्रवारी सर्वसाधारण सभेपूर्वी नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी (नामनिर्देशित) नियुक्ती करणे आवश्यक असते. मात्र, बहुतांश राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांनाच ‘सामाजिक’ म्हणून संधी दिली जाते. यामध्ये अनुभवी, निष्ठावंत, नेत्यांच्या जवळचे आदींचा विचार होतो.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपापल्या पक्षनेतृत्वाकडे मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली असून तीन कार्यकर्त्यांची नावे आयुक्तांना दिली आहे. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या चारशेपेक्षा अधिक होती. त्यांतून छाननी करून १३० पेक्षा अधिक राहिले आहे. पक्षाच्या कोअर कमिटीने इच्छुकांची यादी वरिष्ठांकडे पाठवली आहे. ते कोणाला संधी देतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

असा ठरला कोटा
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील संख्याबळानुसार १२८ नगरसेवकांसाठी १० म्हणजेच १२.८ नगरसेवकांमागे एक नामनिर्देशित सदस्य अर्थात मतांचा काेटा निश्चित आहे. त्यानुसार एका अपक्षासह भाजपचे ८५ नगरसेवकांमागे सात आणि राष्ट्रवादीच्या ३७ नगरसेवकांमागे तीन स्वीकृत सदस्य असतील. शिवसेनेचे सहाच सदस्य असल्याने त्यांचा मतांचा कोटा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेचा स्वीकृत सदस्य नसेल.

मुदतवाढीसाठी भाजपचे पत्र
आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीत भाजपकडील नावे निश्चित होऊ शलली नाहीत. त्यामुळे त्यांनी चार मार्च रोजी स्वीकृत सदस्यपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढीचे पत्र आयुक्तांना दिले आहे. राष्ट्रवादीने सीमा सावळे, फजल शेख आमि राजेंद्र जगताप यांचे अर्ज आयुक्तांकडे दिले असून ते वैध ठरले आहेत.

कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र महापालिका नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम २०१२ नुसार, सार्वत्रिक निवडणूक निकाल अधिसूचित झालेल्या दिनांकापासून एक महिन्यानंतर लगत घेण्यात येणाऱ्या महापालिका बैठकीत स्वीकृत सदस्यांचे अर्ज सादर केले जातील.

स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांची यादी प्रदेश नेत्यांकडे पाठवली आहे. त्यांच्याकडून अद्याप अंतिम यादी आलेली नाही. यादी येईल तेव्हा आयुक्तांकडे सादर केली जाईल.
- प्रशांत शितोळे, पक्षनेते, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com