पार्टीसाठी आलेल्या तरुणांकडून व्हिला मालकाला व केअरटेकरला मारहान

पार्टीसाठी आलेल्या तरुणांकडून व्हिला मालकाला व केअरटेकरला मारहान

Published on

व्हिला मालक, कामगाराला मारहाण
सोमाटणे येथील प्रकार; अकरा जणांवर गुन्हा

पिंपरी, ता. ७ : पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी भांडण करून व्हिला मालक आणि कर्मचाऱ्याला काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता.५) रात्री सोमाटणे येथील गोगो व्हिला येथे घडली.
या प्रकरणी आदित्य ठाणगे (वय २४), ऋतिक वाघमारे (वय २१), शुभम अहिरवाल (वय २५), अनिल ढेगळे (वय २५), अनिकेत वाघेरे (वय २४), शंभुराज रणदिवे (वय २०), गणेश भड (वय २९), प्रणव कोलते (वय २५), संतोष भोसले (वय २०), शिवम घुले (वय २५), अनिल घुले (रा. दिघी, ता. हवेली), हर्ष परदेशी (रा. कळस, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या रोपींची नावे आहेत. गोपाल मोरे (वय ४३, हिंजवडी) असे जखमी व्हिला मालकाचे नाव असून त्यांनी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘आरोपी या व्हिलावर पार्टीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ते सोडवण्यासाठी आलेल्या व्हिला मालकाला शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. तेथील कर्मचारी प्रदीप वाघमारे याला मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिली. शिवाय, व्हिलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.’’

कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू
पिंपरी : कारच्या धडकेत तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) आंबेठाण गावातील मारुती मंदिराजवळ घडली. सूरजकुमार पंकज ठाकुर (रा. आंबेठाण, ता. खेड, मूळ रा. बिहार ) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी दीपक मांडेकर (वय ३३, रा. आंबेठाण, ता. खेड) या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र ठाकूर (२८, रा. आंबेठाण गाव) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘‘फिर्यादी यांचा पुतण्या सूरजकुमार हा घरासमोरचा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून त्याला धडक दिली. यात गाडीचे चाक बालकाच्या पोटावरून गेले. यात गंभीर जखमी होऊन सूरजकुमार याचा मृत्यू झाला.

पिंपरी गावात जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी : जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. ६) सायंकाळी पिंपरी गावात जय हिंद शाळेसमोर पदपथावर करण्‍यात आली. जितेंद्र शिंदे (३६, रा. डॉ. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍याचे नाव आहे. पोलिस शिपाई केशव चेपटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘मालक हरी नायर (रा. रमाईनगर, रिव्हर रोड, पिंपरी) याच्या सांगण्यावरुन आरोपी हा लोकांकडून पैसे घेऊन मटका खेळताना आढळून आला. छाप्यादरम्यान जुगाराचे साहित्य व रोकड असा एक हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.’’

मटका खेळविणाऱ्यावर पिंपरीत कारवाई
पिंपरी : जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (ता. ६) सायंकाळी काळेवाडी ते पिंपरी रस्त्यालगत मिलिंदनगर परिसरात करण्‍यात आली. विजय खंडागळे (४६, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍याचे नाव आहे. पोलिस हवालदार देवा राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘म्हसोबा मंदिराजवळ, स्मशानभूमीशेजारी, काळेवाडी ते पिंपरी रस्त्यालगत मिलिंदनगर येथील मोकळ्या जागेत आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररित्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका हा जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले.’’

कोयता बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी : प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) सायंकाळी काळेवाडी फाटा येथे घडली. या प्रकरणी अनिकेत उर्फ अन्या विश्वकर्मा (१८, विजयनगर, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल तुषार शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस आयुक्तांनी शस्त्रबंदीचे आदेश लागू केलेले असतानाही आरोपी कोयता घेऊन फिरत होता. गस्तीवरील पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले.

वाहतूक पोलिसांना मारहाण; तिघांना अटक
पिंपरी, ता. ७ : अहिल्यादेवी चौक परिसरात वाहतूक पोलिस आणि त्यांच्या मदतनीसांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. ही घटना सोमवार (५ जानेवारी) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथे घडली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत चव्हाण यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदन बगाडे (२४, भोसरी), लहू बगाडे (३०, चिंचवड स्टेशन) आणि अक्षय गालफाडे (३०, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे वॉर्डन मदतनीस सरकारी काम करत असताना आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ केली आणि त्यांच्यासोबत असलेल्या वॉर्डनना मारहाण केली.

तळेगाव एमआयडीसीत हातभट्टीवर छापा 
पिंपरी : गावठी दारूचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई मंगळवारी (ता.६) करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन नांगरे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी येलवाडी, ता. मावळ येथील ५२ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला सुधा नदीजवळील ओढ्यात हातभट्टीची दारू तयार करत होती. पोलिसांची चाहुल लागताच ती पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळावरून कच्चे रसायन जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com