पिंपरी मतदारांची अपेक्षा
आरोपांची धुळवड; पाणीप्रश्नावर ‘मौन’
राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांना सामान्य नागरिकांचा सवाल
पिंपरी, ता. ७ ः गेल्या सहा वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून अद्याप पाणी आलेले नाही. पाण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असून, टॅंकर लॉबी सुसाट आहे, अशा मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी महापालिका निवडणुकीतील उमेदवार व पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, त्याविषयी बोलावे, आश्वासन द्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसह त्यांच्या पक्ष नेत्यांना सामान्य नागरिकांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रचारसभांद्वारे राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यात वैयक्तिक टीका-टिपन्नीसह पक्षाची धोरणे, सत्ताकाळातील गैरव्यवहार, सर्वाधिक कोण जागा जिंकणार? महापौर कोणाचा होणार? अशा मुद्द्यावर अधिक भर आहे. मात्र, पिंपरी चिंचवडसाठी मूलभूत प्रश्न असलेल्या पाण्यासह रस्ते, सोई-सुविधा आदींकडे लक्ष देण्याचे आवाहन सामान्य नागरिक करीत आहेत.
काय करायला हवे
- पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, रस्त्यावर पार्किंग, वाहतूक पोलिसांचा अभाव आणि वाहतूक कोंडी, रात्रीची बांधकामे व धूळ, सतत खंडित होणारा वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य व प्रदूषणाचे प्रश्न, मुलांच्या शाळेतील प्रवेश, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, मुलांसाठी खेळाची मैदाने हे सर्व सोडविण्याची जबाबदारी भावी नगरसेवकांनी घ्यावी
- दर्जेदार रस्ते व नियमित देखभाल, स्मार्ट वाहतूक नियंत्रित दिवे, बसथांब्यांची सुधारणा, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रश्न, २४ तास पाणीपुरवठा, जलसंधारण व पावसाचे पाणी साठवण, आधुनिक ड्रेनेज व नाले साफसफाई, घराघरांतील कचरा संकलन व वर्गीकरण, बायोगॅस किंवा कंपोस्ट प्रकल्प, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, डिजिटल क्लासरूम, महिला व ज्येष्ठ नागरिक आरोग्य योजना, सीसीटीव्ही व स्ट्रीट लाइट, महिला आरोग्य शिबिरे, युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट व स्पर्धा परीक्षा केंद्र, स्टार्टअप व व्यवसाय सल्ला केंद्र, वृक्षारोपण व उद्यानांची निर्मिती, खेळाची मैदाने व सांस्कृतिक केंद्र, प्रदूषण नियंत्रण उपक्रम राबवावेत
प्रभागाचे उत्तरदायित्व म्हणून दर तीन महिन्यांनी नागरिकांसमवेत आढावा सभा घ्यावी. प्रत्येक प्रभागात व्हॉटस्ॲप किंवा हेल्पलाइन सुविधा असावी. कामांचा ऑनलाइन प्रगती अहवाल उपलब्ध करावा. आपला प्रभाग आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित, आनंदी बनवणे हेच नगरसेवकांचे वचन हवे. नागरी समस्या सोडविणे व नागरिकांचे रोजचे जगणे सोपे करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात.
- समाधान गायकवाड, रावेत
दिवसाआडऐवजी दररोज पाणीपुरवठा व्हावा. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शुद्ध किंवा चांगल्या पाण्याचा पुरवठा करावा. पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करावा, पवना नदीचे प्रदूषण कमी करावे. २४ तास पाणी योजना लागू करण्यासाठी काय करणार? ही योजना दोन वर्षात पूर्ण करणार का? याबाबत प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाला विचारायला हवे.
- विनायक पारखी, रस्टन काॅलनी, चिंचवड
------
‘सिटीझन फोरम’चा अपेक्षानामा
पिंपरी चिंचवड शहरातील उच्चशिक्षित स्वयंसेवकांनी एकत्र येऊन सिटीझन फोरमची स्थापना केली आहे. हा गट शहराच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्यरत आहे. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी विविध संस्था, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने नागरिकांचा अपेक्षानामा तयार केला आहे.
पायाभूत सुविधा
पिंपरी चिंचवडची लोकसंख्या २६ लाखांवर आहे. २०४१ मध्ये ६० लाख अपेक्षित आहे. त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा अर्थात पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, दळणवळण (इंटरनेट, फोन नेटवर्क), सार्वजनिक सेवा (कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण) आणि वाहतूक (रस्ते, पूल) सुविधा सुरळीत करणे आवश्यक आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्याची अपुरी
व्यवस्था असल्याने खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर उपाययोजना करून शहर टँकरमुक्त करण्याची अपेक्षा आहे.
पर्यावरण व प्रदूषण
नदी प्रदूषण, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर याचे भयंकर परिणाम होणार आहेत. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, ॲलर्जी, हृदयविकार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हवामानावरही नकारात्मक परिणाम होतो. वाढती वाहने, बांधकामे, अवैध वृक्षतोडीमुळे प्रदूषण वाढत आहे. सुलभ सार्वजनिक वाहतूक, सौर ऊर्जा, पर्यावरणपूरक उत्पादनांचे संशोधन व उत्पादन, योग्य वृक्षांचे रोपण व संगोपन, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरणे, रासायनिक पदार्थांचा कमी वापर करणे, कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी जनजागृती आवश्यक आहे.
आरोग्य व वैद्यकीय सुविधा
जेनेरिक औषधांचा पुरवठा व वापर वाढवणे, सरकारी वैद्यकीय योजनांची जनजागृती करून योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. थेरगाव, आकुर्डी सारखे दवाखाने इतर भागात सुरुवात करून मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभे करावेत. ठिकठिकाणी स्वच्छतागृह सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी. नियमित साफसफाई करावी. योग्य दरात औषधोपचार उपलब्ध करावीत. आरोग्याविषयी व सरकारी योजनांचा जनजागृती करून योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचण्याची यंत्रणा तयार करावी.
नागरिकांचे प्रश्न-समस्या
- रेडझोन बाधित घरांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी समिती नेमावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घरे नियमित करावीत. विकासकामांवर नागरिकांशी चर्चा करावी. विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती आणि सूचनांचा अभ्यास करून नवीन डीपी तयार करावा. आताचा डीपी रद्द करावा.
- सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सक्षम करावेत. वाहतूकसह सर्व पोलिसांकडे सीसीटीव्ही आधारित चलन प्रणाली, समाज माध्यमांचा योग्य वापर आणि ऑनलाइन एफआयआर प्रणाली असावी. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभाग स्थापून जागृतीवर भर द्यावा.
- रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि प्रमुख चौक मोकळे करून वाहतूक कोंडीतून सुटका करावी. सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम करून मेट्रोचे जाळे वाढवणे, बससंख्या वाढवणे, मेट्रो आणि पीएमपी एकमेकांस पूरक ठरतील, अशी योजना असावी. दिशादर्शक फलक लावून नियमानुसार गतिरोधक असावेत.
- क्रीडा व्यवस्था उत्तम असून, योग्य देखभाल व शिक्षक समन्वयक असावेत. गरजू ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार उपलब्ध करावेत. प्रभाग आणि स्थायी समिती सभेत पत्रकार व नागरिकांना प्रवेश मिळावा.
PNE26V83372
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

