जीवघेण्या नायलॉन मांजाचा शहराभोवती ‘फास’
पिंपरी, ता. ७ : पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चायनीज नायलॉन मांजाचा वापर होत आहे. शहरात जीवघेण्या मांजाची राजरोसपणे विक्री होताना दिसून येते. बोपखेल पुलावरून दुचाकीने प्रवास करताना चार महिलांच्या हाताला आणि गळ्याला जखमा झाल्या. तर मांजात अडकून काही पक्ष्यांचा मृत्यूही झाला आहे. पण, या घटनेनंतरही प्रशासन ढिम्म असून विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवले जातात. शहरातही या खेळात मुले सहभागी होतात. मुळात हा मांजा अधिक धारधार असतो. प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापण्याच्या नादात हवेतच हा मांजा तुटतो. त्यामुळे पतंग मांजासह हवेच्या दिशेने खाली येते. तो झाडावर किंवा इमारतीवर पडतो, रस्त्यावरही येतो. परंतु, उड्डाणपुलाची उंची जास्त असल्यामुळे पतंग व मांजा थेट उड्डाणपुलावरील रस्त्याकडेला असलेल्या झाडांवर किंवा पथदिव्यांच्या खांबाला अडकतो. बऱ्याच वेळा मांजा सहजपणे दिसत नाही. त्यामुळे उड्डाणपुलावरून जाताना गळा चिरण्याच्या धोका असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
सर्वाधिक धोका पक्ष्यांना
आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना मांजामुळे दुखापत होण्याचा धोका असतो. काहीवेळा तर मांजामुळे पक्ष्यांचा जीवदेखील जातो. नुकतीच एक घटना काळेवाडीतील तापकीर नगरमध्ये घडली असून यात एका पोपटाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक फाटा उड्डाणपुलावर झाला होता अपघात
- २०१८ - पुण्यात हजमा खान ही तीन वर्षीय चिमुकली मांजामुळे गंभीर जखमी झाली होती. यात तिच्या डोळ्यांना इजा झाली होती.
७ ऑक्टोबर २०१८ - कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे असलेला दुमजली जेआरडी टाटा उड्डाणपुलावर दुचाकीवर जात असताना मांजा गळ्यात अडकून कृपाली निकम (वय २६) डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला.
- २५ डिसेंबर २०२५ - काळेवाडीतील तापकीर नगरमध्ये एक पोपटाचा मांज्याला अडकून जीव गेला.
- २ व ३ डिसेंबर २०२५ - बोपखेल पुलावरून दुचाकीने प्रवास करताना वाऱ्याच्या प्रवाहाने आलेला मांजा अडकून चार महिलांच्या हाताला आणि गळ्याला जखमा झाल्या आहेत.
- दोन डिसेंबर २०२५ बोपखेल पुलावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या अर्चना पवार नावाच्या महिलेच्या गळ्याला गंभीर कापल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
असा करा बचाव
दुचाकीवर जाताना धोकादायक मांजापासून आपली काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे आहे. या मांजाचा आकार लहान असल्याने तो लांबून डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे महिला किंवा पुरुष यांनी दुचाकीवर जाताना आपला जीव वाचावा, यासाठी मफलर, स्कार्प, ओढणी किंवा इतर दर्जेदार वस्त्र गुंडाळणे आवश्यक आहे.
कामावरून घरी जात असताना मांजाला पोपट अडकलेला दिसला. त्याची सोडवणूक करण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण, त्यापूर्वीच पोपटाचा मृत्यू झाला. शहरात अजूनही नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून येत आहे.
- महेश भोरे, प्राणीप्रेमी
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. नागरी सुरक्षेचा विचार करून व्यापाऱ्यांनी अशा मांजाची विक्री करू नये.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
PNE26V83361
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

