महापालिका ‘रणांगणा’त राज्यस्तरीय ‘रणधुमाळी’!

महापालिका ‘रणांगणा’त राज्यस्तरीय ‘रणधुमाळी’!

Published on

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः महापालिका निवडणूक प्रचार स्थानिकऐवजी राज्यस्तरीय व पक्षीय संघर्षाच्या पातळीवर पोहोचला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी नागरिकांसमोर मांडायचे स्थानिक प्रश्न, विकासाचे आराखडे आणि दैनंदिन सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच मोठ्या नेत्यांच्या सभा, रोड शो, एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप व टीका-टीपण्णी होत आहे. यामुळे उमेदवार मागे आणि स्टार प्रचारक पुढे, असे चित्र निर्माण झाले आहे.
शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी भाष्य केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी पवार यांच्यावर निशाना साधत, ‘धमक असेल तर सत्तेला लाथ मारून बाजूला व्हावे’ असे आवाहन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भ्रष्टाचाराचा भस्मासुर म्हणत पवार यांना हिणवले. तर, शिवसेनेचे उदय सामंत यांनी कोणावरही टीका व आरोप न करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर ठिकठिकाणी सभा आणि रोड शो घेत पवार यांनी पुन्हा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला डिवचले. महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी ४० वर्षांत पवार यांनी शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा विचार कधीच केला नाही, असा आरोप करत दोन्ही राष्ट्रवादींवर संधान साधले.

पक्षीय वर्चस्वाची लढाई?
भाजप नेत्यांकडून प्रचारात केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे आम्ही कसे बलाढ्य आहोत, हेच दाखविण्याचा अधिक प्रयत्न केला जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठीमागच्या विकासकामांचे गाणे जोमाने गायले जात आहे. शिवसेनेकडूनही राज्यभरातील विकास कामांची माहिती देऊन स्वतःची प्रतिमा उजळून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घडामोडींमुळे ही निवडणूक नेमकी नगरसेवक निवडण्यासाठी आहे? की पक्षीय ताकद दाखवण्याची? असा प्रश्न आहे.

हरवलेल्या मुद्द्यांना प्राधान्य?
नेत्यांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पकालीन राजकारण साधले जाऊ शकते. मात्र, दीर्घकालीन प्रक्रियेसाठी ते घातक ठरू शकते. स्थानिक प्रश्नांवर आधारित चर्चा आणि उत्तरदायित्वाची मांडणी न झाल्यास, निवडणुकीनंतरही नागरिकांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडकर मतदार जागरूक असल्याचे नेहमीच सांगितले जाते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात हरवलेल्या स्थानिक मुद्द्यांना मतदार किती प्राधान्य देतात, यावरच या निवडणुकीचा खरा निकाल अवलंबून असेल.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com