प्रतिबंधात्मक कारवायांमुळे गुन्हेगारीत सातत्यपूर्ण घट
पिंपरी, ता. ७ ः मागील तीन वर्षांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीत सातत्याने घट झाल्याचा दावा पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (ता.७) केला. तसेच मागील वर्षी ४५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील २१३ आरोपींवर मकोका, ३५ गुन्हेगार स्थानबद्ध तर ३६८ गुन्हेगार तडीपार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी चौबे यांनी निगडी येथील पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, सर्व पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौबे म्हणाले, ‘‘मागील वर्षी एक अपर पोलिस आयुक्त, तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांना मान्यता मिळाली. उत्तर महाळुंगे, चाकण दक्षिण, दापोडी, बावधन, काळेवाडी, संत तुकारामनगर या पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये आठ पोलिस निरीक्षक, १२ सहायक पोलिस निरीक्षक, २६ पोलिस उपनिरीक्षक, २८२ शिपाई, चार सफाई कामगार अशा ३३२ पदांना मान्यता मिळाली. नवीन पदे आणि पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे परिमंडळांची (झोन)ची रचना देखील बदलण्यात आली. चौथे परिमंडळ नव्याने तयार करण्यात आले.’’
२२ हजार ज्येष्ठांना मदत
पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ ही सेवा सुरू केली. ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास ते या ॲपच्या माध्यमातून पोलिसांकडे मागू शकतात. आयुक्तालयाच्या हद्दीतील २२ हजार ज्येष्ठ नागरिकांनी याद्वारे आपली नोंदणी केली असून त्यांना पोलिस मदत करत आहेत. या ॲपमध्ये ज्येष्ठांसाठीच्या सरकारी योजना, जवळची सरकारी रुग्णालये आणि इतर आवश्यक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली असल्याचे चौबे यांनी सांगितले.
‘ट्रॅफिक बडी’ला प्रतिसाद
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील वर्षी ‘ट्रॅफिक बडी’ ही संकल्पना राबविली. यामध्ये आतापर्यंत आठ हजार २५७ नागरिकांनी वाहतुकीशी संबंधित तक्रारी केल्या. त्यातील सहा हजार ५३३ तक्रारी सोडवण्यात आल्या असून १७०८ तक्रारी नाकारण्यात आल्या. तर १६ तक्रारींवर काम सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सर्वाधिक तक्रारी वाहतुकीचे नियम मोडल्याबाबत आहेत. त्यापाठोपाठ बेशिस्त पार्किंग, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अवजड वाहनांबत तक्रारी असल्याचे चौबे यांनी नमूद केले.
पीडितांना २४ कोटी परत
सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून मागील वर्षी सायबर गुन्हेगारीचे २६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर २१५ आरोपींना अटक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी केलेल्या फसवणुकीतील २४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८४२ रुपये पीडित नागरिकांना परत दिले. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये ४०४.७३ टक्के अधिक परतावा केल्याचेही त्यांनी सांगितले.
चौबे म्हणाले ?
- सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पूरग्रस्तांसाठी ४४ लाखांची मदत
- १३६ पोलिस पाल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली
- एका वर्षात पाच हजार ८१८ अवैध धंद्यांबाबत गुन्हे, १६ कोटी ३७ लाख ११ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
- शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेबाबत गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांसह व्हिजिबल पोलिसिंगवर भर
- हद्दीतील एक हजार ४५ संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तिथे सातत्याने गस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

