मूर्ती घोटाळ्याचा आरोप, तरीही उमेदवारी ?
पिंपरी, ता. ८ ः ‘‘माझ्या कार्यकाळात कर्जरोखे काढले नाहीत. बिले थकवली नाहीत. आर्थिक शिस्त पाळत सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रस्ते, रुग्णालये व कोविड काळात लसीकरणाच्या सुविधा उभ्या केल्या. या भागातल्या आदिवासी महिलेला महापौर केले. त्यांच्या काळात ज्या मूर्ती घोटाळ्याचा आरोप झाला, तीच पदाधिकारी आज भाजपची उमेदवार असल्याने तो आरोप खरा होता की निवडणुकीचा जुमला होता ?, भ्रष्टाचार झाला असेल, तर त्यांना उमेदवारी कशी दिली, याचे उत्तर द्यावे,’’ असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ८) दिले.
सांगवी येथील प्रभाग क्र.३२ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपचा उल्लेख न करता त्यांनी हे आव्हान दिले. व्यासपीठावर आमदार रोहित पवार उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘सांगवी परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, रात्री उशिरापर्यंत गोंधळ, धांगडधिंगा सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. बेकायदेशीर हॉटेल्सना परवानग्या दिल्या असतील, तर ते महापालिकेचे अपयश आहे. विकासकामांसाठी आरक्षित जागा ताब्यात नसल्याने अनेक प्रकल्प रखडले असून परिसराचा अपेक्षित विकास झालेला नाही.’’
अजित पवार म्हणाले, ‘‘प्रदूषित नदीमुळे दुर्गंधीचा त्रास आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संविधान चौक ते माहेश्वरी चौक आणि सांगवी फाटा परिसरात बेकायदेशीर गुंठेवारी पद्धतीने झालेल्या बांधकामांमुळे दाटीवाटी निर्माण झाली आहे. त्यावर वेळेत योग्य उपाय न केल्याने आज रस्ते अरुंद झाले आहेत. गणेशनगर, समतानगर, स्वामी विवेकानंदनगर, विवेकानंद सोसायटी, आदर्शनगर व राजारामनगर या भागांत पहाटे चार वाजता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची झोपमोड होते. यामुळे महिलांना दिवसभराचे नियोजन करणे कठीण जाते. उद्यानांची दुरवस्था, सांगवी पुलाचे रखडलेले काम, नदी सुधार प्रकल्पातील विलंब आणि मधुबन सोसायटी परिसरातील टीपीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.’’
लोकसंख्येच्या तुलनेत जलवाहिन्या न वाढविल्याने पाणीपुरवठ्याची समस्या आहे. आपण कामावर विश्वास ठेवणारा माणूस असून, ‘एआय’सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार म्हणाले,
- दहा हजार कंत्राटी सफाई कर्मचारी दाखवले जातात आणि प्रत्यक्षात किती काम करतात हे देखील तपासणे गरजेचे
- झोपडपट्ट्या दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे टीडीआर देण्याचा प्रकार सुरू.
- इंद्रायणी नदीपात्रातील ३६ बंगले पाडले बांधून का दिले ?
- कुदळवाडीतील साडेचार हजार अतिक्रमणे काढली आणि दुसरीकडे हजारो पत्राशेड उभी राहिली
- कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करून मार्ग का काढला नाही ?
- कोणाचीही आर्थिक ताकद वाढवली नाही म्हणून काही लोकांनी साथ सोडली.
- आर्थिक अपेक्षेपोटी काही मंडळींचे पक्षांतर
- नऊ हजार ५५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील तब्बल ७० टक्के कॅमेरे बंद
अर्बन स्ट्रीटवर १४९ कोटी खर्च
भोसरीतील शीतल बाग प्रकल्पाचा खर्च सुमारे ७० लाखांचा असताना तो थेट सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली काही ठरावीक लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्याच निकटवर्तीय कंपन्यांना कामे दिली जात आहेत. धनश्री कन्स्ट्रक्शन ही आमदाराच्या भावाची कंपनी असून, गेल्या नऊ वर्षांत या कंपनीने मोठ्या प्रमाणावर कामे मिळवत झपाट्याने विस्तार केला, असा आरोप त्यांनी केला. अर्बन स्ट्रीट फुटपाथ प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. दापोडी ते निगडी या मार्गावरील फुटपाथसाठी सुरुवातीला शंभर कोटींचे बजेट सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात १४९ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

