

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : शहरात इमारतींच्या गच्च्यांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पार्टी स्पेसची संख्या वाढत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या ताज्या सर्वेक्षणात केवळ सात अनधिकृत रुफटॉप हॉटेल्स आढळली आहेत.
याआधी २०२३ मधील सर्वेक्षणात ४९ रुफटॉप हॉटेल्सची नोंद झाली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या तपासणीत २१ अनधिकृत हॉटेल्स आढळली होती. वेगवेगळ्या विभागांच्या आकडेवारीतील तफावतीमुळे अतिक्रमण विभागाच्या सर्वेक्षणाच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, निगडी-प्राधिकरण, स्पाइन रोड, रावेत, भोसरी आदी भागांत अनेक इमारतींच्या टेरेसवर हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि पार्टी स्पेस सुरू आहेत. पिंपळे सौदागरमधील काही प्रमुख रस्त्यांवरच एकापेक्षा जास्त रुफटॉप हॉटेल्स दिसतात. रात्री उशिरापर्यंत गर्दी, किचन, गॅस सिलिंडर, विद्युत सजावट आणि आसनव्यवस्था असतानाही महापालिकेच्या ताज्या पाहणीत शहरभर केवळ सात ठिकाणे नोंदविली जाणे संशयाला वाव देणारे ठरत आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तपासणीत २०२३ मध्ये अनेकांकडे बांधकाम परवानगी, वापरातील बदलाची मंजुरी किंवा अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पूर्णतः अनधिकृत नऊ हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. अग्निशमन विभागाच्या तपासणीत अनधिकृत रुफटॉप हॉटेलची संख्या वाढली होती. अशावेळी ४९ पैकी उर्वरित हॉटेल बंद झाली का, त्यांनी आवश्यक परवानग्या घेतल्या का, की ती नव्या तपासणीत आढळलीच नाहीत, याबाबत प्रशासनाकडे कसलीही माहिती नाही. एखादी आग अथवा दुर्घटना घडल्यास रुफटॉप हॉटेलमधून बाहेर पडणे कठीण ठरू शकते. त्यामुळे केवळ कागदोपत्री पाहणी न करता बांधकाम परवानगी, अग्निसुरक्षा, आपत्कालीन मार्ग आणि स्वयंपाकगृहातील सुरक्षेची संयुक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
--
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांनी शहरातील रुफटॉप हॉटेल्सचे सर्वेक्षण केले. त्यात सात हॉटेल्स असल्याचे कळविले आहे. मात्र, आणखी रुफटॉप हॉटेल्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा सविस्तर सर्वेक्षण करण्यात येईल.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
----
सर्वेक्षणात वेगवेगळे आकडे
सर्वेक्षण / विभाग रूफटॉप हॉटेलची नोंद
अतिक्रमण विभाग (२०२३)- ४९
अग्निशमन विभाग - २१ अनधिकृत
अतिक्रमण विभागाचे ताजे सर्वेक्षण - ७
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.