

पिंपरी, ता. २ ः ई-मीटरला डावलून पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकांकडून अगोदरच मनमानी लूट चालू असताना आता ‘ओन्ली मीटर’ या खासगी संकेतस्थळाचा वापर करुन रिक्षाचालक प्रवाशांकडून सक्तीने भाडे आकारत आहेत. त्यामुळे ‘ओन्ली मीटर’चा वापर करुन पैसे घेण्याची सक्ती का ? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये रिक्षांना ई-मीटर बसविणे बंधनकारक केले. परंतु, पिंपरी चिंचवडमध्ये साधारणत: एक-दोन वर्षांनंतर रिक्षाचालकांनी ई-मीटर बंद असल्याचे सांगून ठरवून भाडे आकारण्याची पद्धत सुरू केली. परिणामी, एकाच मार्गावर, एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जाऊ लागले. कालांतराने ‘ओला’, ‘उबेर’ आणि ‘रॅपिडो’ यासारख्या काही कंपन्यानी ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली. मात्र, गेल्या वर्षीपासून ऑनलाइन ॲपआधारित सेवा देणाऱ्या कंपन्या चालकांना दर कमी देत असल्याचे कारण पुढे करत काही रिक्षा, कॅब चालक आणि काही संघटनांकडून त्यानुसार भाडे आकारणी नाकारली जात आहे.
भाड्यात तफावत
ॲपवर बुकींग करताना प्रवाशांना वेगळे भाडे दिसते आणि प्रत्यक्षात रिक्षाचालकाकडून वेगळा भाडे आकारले जाते. ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरील भाडे हे ॲपवरील भाडेदरापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन विभागाची कोणतीही मान्यता नसताना या संकेतस्थळाचा सर्रास वापर करुन भाडे आकारणी केली जात आहे.
आरटीओ निरीक्षकाने कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षा मीटरचे दर वैध आहे. कोणतेही ॲप किंवा संकेतस्थळाचे मीटर अवैध असून त्याप्रमाणे आकारलेले भाडे कायद्याला धरुन नाही.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
रिक्षा चालक ॲपद्वारे भाडे स्वीकारतात. पण, पैसे घेताना मात्र ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळाचा वापर करुन किती किलोमीटर झाले. त्यानुसार पैसे घेतात. ही नागरिकांची एकप्रकारे फसवणूक आहे.
- राहुल शिंदे, प्रवासी
रिक्षा चालकांनी रिक्षामध्ये बसवलेल्या ई-मीटरप्रमाणेच पैसे घेतले पाहिजेत. प्रवाशांनीही मीटरप्रमाणेच पैसे द्यावेत. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात सांगड घालण्यासाठी ॲपचा वापर करावा. पण, भाडे ठरविण्याचा कोणत्याही ॲपला अधिकारच नाही.
- नितीन पवार, अध्यक्ष, रिक्षा पंचायत, पुणे पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.