सकाळ संवाद

सकाळ संवाद
Published on

चेंबरचे झाकण दुरुस्त करा
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून पुण्याच्या दिशेने जाताना खराळवाडीजवळ रस्त्यावर चेंबरवरील लोखंडी जाळी काही ठिकाणी दबली आहे. काही ठिकाणच्या लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत. सध्या बाजूला दगडे ठेवले आहेत. तेव्हा, अपघात होण्याअगोदर चेंबर वरील झाकण दुरूस्त होत असेल, तर करावेत.
- इंद्रजीत चव्हाण, पिंपरी
PNE26W17181


विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास
पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथील साधुराम मंगल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहने चालविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत अनेक दुचाकी व चारचाकी चालक नियम धाब्यावर बसवून सर्रास विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसतात. त्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढला आहे. पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही.
- निर्गुण थोरे
PNE26W17167

एसटी प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
पुणे - मुंबई रस्त्यावर दापोडीपासून निगडीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरून कोण कोणत्या वाहनांना प्रवेश करता येईल ? कोणत्या प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही, याचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. फक्त एकच सूचना फलक पिंपरीच्या ग्रेडसेपरेटरच्या अगदी तोंडावर लावण्यात आला आहे. या फलकाकडे सर्वसाधारणपणे कोणाचेच लक्ष जात नाही. त्यामुळेच या रस्त्याने पादचारी आणि सायकलस्वार पण सर्रास घुसखोरी करताना दिसतात. बऱ्याच वेळेस ट्रॅक्टर, जेसीबी, क्रेन पण या रस्त्यावरून जाताना दिसतात. एसटी बसला सेवा रस्त्याने जाण्यास निर्देशित केलेले असताना बस चालक मुख्य रस्त्यावरून जाताना दिसतात आणि प्रवाशांना रस्त्यावर उतरवतात. त्याकडे महापालिका प्रशासनाचे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष नाही.
- सचिन ताम्हाणे, चिंचवड
PNE26W17170

तातडीने चेंबरची दुरुस्ती हवी
भुजबळ चौकातून हिंजवडीकडे जाताना अटलांटा सोसायटी - विनोदेनगर चौकाच्या अगोदर कस्तुरी चौकातील चेंबर अंदाजे एका बाजूने ३-४ इंच खचला आहे. दररोज दिवसा खूप वर्दळ असून कस्तुरी चौक किंवा विनोदे चौक येथे ट्रॅफिक वॉर्डनचे दर्शन दुर्मिळच. असो, तातडीने चेंबरची दुरुस्ती व्हावी.
- रमेश अटकळे, पिंपळे गुरव
PNE26W17169

सिमेंट ब्लॉक उखडल्याने अपघात
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालया समोरील सिमेंटचे ब्लॉक महिनाभरापासून पूर्णपणे उखडलेले आहेत. संपूर्ण रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. पिंपळे गुरवमधील हा चौक खूप वर्दळीचा असून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा चालू असते. शेजारीच छोटी-छोटी नाश्त्याची दुकाने आहेत. त्यामुळे हा रस्ता सतत गजबजलेला असतो. ब्लॉक उखडून गेल्याने तेथे मोठ्या प्रमाणात माती पसरलेली आहे. त्यावरुन जाताना अनेक वेळा दुचाकी वाहने घसरून पडल्याने अपघात होतात. महानगरपालिकेने लवकरात लवकर तेथील रस्ता दुरुस्त करावा. तसेच संभाव्य हानी टाळावी.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
26W17168

भिक्षेकऱ्याला हटवा
यशवंतनगर चौक येथे एक भिक्षेकरी पांगुळ गाडीवर भिक्षा मागत असतो. परंतु या रस्त्यावर अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ही व्यक्ती अचानक सर्व वाहनांजवळ येऊन भिक्षा मागते. काही वेळेस मोठ्या वाहनांना ही व्यक्ती दिसत नाही. मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच यशवंतनगर थांब्यावर पोलिस घोळका करून थांबलेले असतात. पण, ते या चौकात लक्ष देत नाही. तरी संबंधित वाहतूक विभागाने कृपया लक्ष द्यावे. भविष्यात होणारा अपघात टाळावा.
- विलास शेडगे, टेल्को-भोसरी रस्ता
PNE26W17173

Marathi News Esakal
www.esakal.com