गावोगावी रंगला लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ
पवनानगर ता. ५ : पवन मावळातील बहुतांश गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गौरी-गणपती विसर्जनानंतर त्या दिवशी किंवा दोन दिवसांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये गावातील मुली-महिलांचा उत्साहाने सहभाग असतो. हा कार्यक्रम नागपंचमीपासून सुरू होतो आणि गौरी-गणपती विसर्जनानंतर त्याचा समारोप होतो.
पवनमावळात भात लागवडीनंतर शेतीतील कामे उरकलेली असतात. तसेच महिलांनाही शेती आणि घरकामांमुळे वर्षभर विरंगुळ्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील महिला या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होतात. या सर्व महिला गावातील मंदिर किंवा पारावर एकत्र येतात. फुगड्या, फेर धरून पारंपरिक गाणी गातात. त्यासोबतच उखाणे, भारूड सादरीकरण करतात. वेगवेगळे सोंग घेऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटतात. गावातील सर्व स्तरांतील व्यक्तींच्या बोलण्या-चालण्याचा नकला, विविध कौशल्यांचे सादरीकरण या महिला करतात. उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, तसेच नवीन ‘रील ट्रेंड’ अशा स्पर्धा होतात. या सोहळ्यामध्ये अनेक महिला रोजच्या संसारातील सुख-दु:ख विसरून आनंदाने सहभागी होतात. या कालावधीत घरोघरच्या महिला नियोजन करुन रात्रभर पारंपरिक गाणी, फुगडी, नकला असे कार्यक्रम सादर करतात. त्यांच्यासाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था आयोजकांच्या घरी असते. विशेष म्हणजे, गावातील पुरूष मंडळी स्वयंपाकासह, भजनासाठीही मदत करतात.
मुलीला पसंती अन् विवाह सोहळा
लेकी मागण्याच्या या दोन दिवसांमध्ये रात्रभर गाण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही सकाळी पुन्हा गाणी व इतर कार्यक्रम असतात. दुपारी एकच्या सुमारास विवाह सोहळा सुरू होतो. त्यामध्ये एखाद्या लहान मुलीला मुलाच्या पोषाखात सजविले जाते. त्या मुलाकडील मंडळी मागणी घालण्यासाठी मुलीच्या घरी जातात. रिवाजाप्रमाणे, मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो. पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल-ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात काढली जाते. त्यामध्ये महिला मनसोक्त नाचतात, गातात. त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा होतो. जमलेल्या मंडळींना भोजन दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.