मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचे मन हेलावले
रावेत, ता.७ ः मानवतेचा खरा अर्थ समजून घेत रावेत येथील महापालिका शाळा क्रमांक ९७ केशवनगर भाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दया, सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या विद्यार्थ्यांनी अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू जमा करून पूरग्रस्तांना आणि त्यांच्या शाळकरी मुलांना मदतीचा हात दिला.
गणेश बोरा, गोविंद जगदाळे, सुभाष वाल्हेकर, वसंत ढवळे, संदीप भालके आदी यावेळी उपस्थित होते. आम्ही थोडीशी मदत केली. पण, त्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आणले. हेच मोठे समाधान असल्याचे विद्यार्थिनी पूजा पवार हिने नमूद केले. तर शेतकऱ्यांच्या श्रमामुळे आपण अन्न खातो. त्यांचे दुःख पाहून शांत बसणे शक्य नव्हते म्हणून आम्ही वर्गातून वस्तू गोळा केल्याचे विद्यार्थी राम मगदूम याने सांगितले.
‘‘विद्यार्थ्यांनी अपेक्षापेक्षा अधिक मदत जमा केली. ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिल्याचा आम्हाला आनंद आहे. लहान वयात सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे ही मोठी गोष्ट आहे. या विद्यार्थ्यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे.’’
- रामेश्वर पवार, मुख्याध्यापक
RVT25A00031