पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हासू परत आणले, हेच मोठे समाधान !
रावेत, ता. ७ ः मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध सामाजिक संस्था-संघटनांबरोबरच आता शालेय विद्यार्थ्यांचे छोटे हातही पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांप्रती संवेदनशीलता दाखवून अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू शाळांमधून पाठविल्या जात आहेत. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर परत हासू आणले; हेच मोठे समाधान असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
रावेत येथील महापालिका शाळा क्रमांक ९७ केशवनगर भाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या विद्यार्थ्यांनी अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू जमा करून पूरग्रस्तांना आणि त्यांच्या शाळकरी मुलांना पाठविल्या.
गणेश बोरा, गोविंद जगदाळे, सुभाष वाल्हेकर, वसंत ढवळे, संदीप भालके आदी यावेळी उपस्थित होते. आम्ही थोडीशी मदत केली. पण, त्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आणले. हेच मोठे समाधान असल्याचे विद्यार्थिनी पूजा पवार हिने नमूद केले. तर शेतकऱ्यांच्या श्रमामुळे आपण अन्न खातो. त्यांचे दुःख पाहून शांत बसणे शक्य नव्हते म्हणून आम्ही वर्गातून वस्तू गोळा केल्याचे विद्यार्थी राम मगदूम याने सांगितले.
स्वखर्चाने मदत पाठविली
जुनी सांगवी ः येथील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी संकलित केलेली मदत शाळेने स्वतःच्या खर्चाने पूरग्रस्तापर्यंत पाठवून दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी साखर, चहा पावडर, टूथब्रश, टूथपेस्ट, अंगाचा व कपड्याचा साबण, गहू, तांदूळ, विविध प्रकारचे बिस्कीट पुडे, मसाला पुडे, तसेच हरभरा डाळ, मूग डाळ, तूरडाळ असे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केले. शाळेतील शिक्षकांनी ७५ पॅकेट बीड तालुका व जिल्ह्यातील कुक्कडगाव या गावाचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांची भेट देऊन प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या हाती सुपूर्त केले आहेत. त्यामध्ये शिक्षक योगेश भोसले, तुषार वरपे व स्वानंद तळेकर यांचे योगदान राहिले. या उपक्रमाबद्दल तेथील ग्रामस्थांनी विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक संकपाळ, प्राचार्य शरद ढोरे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला जाधव, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे आभार मानले. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘‘विद्यार्थ्यांनी अपेक्षापेक्षा अधिक मदत जमा केली. ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिल्याचा आम्हाला आनंद आहे. लहान वयात सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे ही मोठी गोष्ट आहे. या विद्यार्थ्यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे.’’
- रामेश्वर पवार, मुख्याध्यापक, महापालिका शाळा क्रमांक ९७, केशवनगर भाग
RVT25A00031