रावेतमध्ये राडारोड्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

रावेतमध्ये राडारोड्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

Published on

रावेत, ता. २८ : रावेत परिसरात राडारोडा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत जागेवर राडारोडा टाकला जात असला, तरी त्या ठिकाणी आवश्यक प्रक्रिया, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि वेळेवर साफसफाई होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडते आणि दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राडारोड्यातून धूळ वाऱ्यामुळे सतत हवेत मिसळते. हा सूक्ष्म धुळीचा थर घरात, वाहनांवर, दुकानांवर आणि विशेषत: पादचाऱ्यांच्या चेहऱ्यावर थेट बसतो. अनेक ठिकाणी नागरिकांचे डोळे जळजळणे, खोकला, श्वसनाचा त्रास आणि ॲलर्जी अशा तक्रार वाढलेल्या आहेत.
राडारोड्यात मातीसोबत प्लास्टिक, पान-फुले, बांधकामातील रासायनिक साहित्य, ओलसर कचरा असे अनेक घटक मिसळलेले असतात. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. दुकानदार आणि रहिवाशांचे म्हणणे आहे की गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांना समोरचा रस्ता स्पष्ट न दिसल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
रावेतमधील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर राडारोडा व्यवस्थापन ही प्राथमिक गरज असून प्रशासनाने तातडीने गतिमान उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

राडारोडा अधिकृत जागेवर पण व्यवस्थापन शून्य
-राडारोडा व्यवस्थित पसरून न ठेवणे
-वेळेवर ट्रॉली हटविली न जाणे
-धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी न करणे
-परिसर कुंपणाने न वेढणे

नागरिकांची मागणी
-राडारोड्यावर दररोज पाणी फवारणी करावी
-जागेला कुंपण घालून राडारोडा नियंत्रित करावा
-ढिगारे तत्काळ हटवून प्रक्रिया पूर्ण करावी
-आरोग्य विभागाने तपासणी करून धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर करावी
-सेफ्टी स्टॅंडर्डनुसार व्यवस्थापन न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी


धूळ इतकी उडते की सकाळ-संध्याकाळ घराची खिडकी उघडता येत नाही. मुलांना सतत खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. अनेकदा तक्रार केली पण प्रतिसाद मिळत नाही.
-अनिल काटे, स्थानिक रहिवासी

सकाळी राडारोडा टाकण्याच्या जागे जवळच ओपन जिम उभारण्यात आली आहे. तसेच पदपथ असल्यामुळे येथे हजारो नागरिक रोज मॉर्निंग वॉकला येतात. सकाळी उग्र वास येत असल्यामुळे त्रास होतो.
-संगीता माळी, स्थानिक नागरिक

परिसरातील हवा प्रदूषित होत आहे. मुले, ज्येष्ठ आणि रुग्ण सर्वाधिक त्रासात आहेत. याकडे त्वरित लक्ष न दिल्यास समस्या गंभीर होईल.
-अनिरुद्ध काळे, स्थानिक रहिवासी

महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाशी बोलून कार्यवाही करण्यास सांगितले आहे. धुळीवर पाणी फवारणीसंदर्भात कार्यवाही सुरू आहे.
राजाराम सरगर, सहाय्यक आयुक्त, ब प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com