प्रदूषणामुळे श्वास घेणेही कठीण
रावेत, ता. ३१ : रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी आणि किवळे ही उपनगरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात पुरती अडकली आहेत. वाढते शहरीकरण, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे या भागातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, वाकड-हिंजवडी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अनेकदा ‘खराब’ ते ‘अतिखराब’ पातळीवर पोहोचत आहे. याचा थेट परिणाम रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी व किवळे भागावर होत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी हवेत सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५ आणि पीएम १०) प्रमाण अधिक आढळून येत आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर मेट्रो, रस्ते रुंदीकरण, गृहप्रकल्प आणि व्यावसायिक संकुलांची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बांधकामस्थळी आवश्यक ती पाणी फवारणी होत नसल्याने धूळ थेट हवेत मिसळते. तसेच जड वाहनांची सततची वर्दळ, अपूर्ण रस्ते आणि साचलेली माती यामुळे प्रदूषणात भर पडत आहे.
‘‘विकासाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालू नये,’’ अशी तीव्र भावना या भागांतील नागरिक व्यक्त करत आहे. तसेच ‘‘हवा प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने नियंत्रण न केल्यास आंदोलन छेडू,’’ असा इशाराही दिला जात आहे.
सकाळी बाल्कनीत उभे राहिले तरी डोळ्यांची जळजळ होते. लहान मुलांना खोकला आणि श्वसनाचा त्रास वाढला आहे.
- प्रवीण देशमुख, रहिवासी, रावेत
पूर्वी हा भाग मोकळा आणि स्वच्छ होता. आता सतत धूर आणि धुळीचा त्रास सहन करावा लागतो. श्वास घेतानाही त्रास होतो.
- अशोक काळभोर, ज्येष्ठ नागरिक, आकुर्डी
नागरिकांचा आरोप
‘‘महापालिका कर वसुलीत तत्पर असली तरी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. बांधकामांवर नियंत्रण, नियमित पाणी फवारणी, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,’’ असा आरोप नागरिक करत आहेत.
दीर्घकाळ अशी दूषित हवा श्वसन मार्गात गेल्यास दमा, ब्राँकायटिस, फुफ्फुसांचे आजार, तसेच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे.
- डॉ. बाळासाहेब होडघर, वरिष्ठ आरोग्य अधिकारी, कुटे हॉस्पिटल, आकुर्डी
रावेत आकुर्डी भागातील ‘एक्यूआय’
दिवस - सरासरी प्रमाण
३१ डिसेंबर - २१७
३० डिसेंबर - ३२२
२९ डिसेंबर -२८७
२८ डिसेंबर - ३१२
२७ डिसेंबर - ३००
----------
‘एक्यूआय’ प्रमाण आणि श्रेणी
०-५० चांगले
५१-१०० समाधानकारक
१०१-२०० मध्यम
२०१-३०० खराब
३०१-४०० अतिशय खराब
४०१-५०० गंभीर
-----------
माहिती स्रोत : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ संकेतस्थळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

