रावेत परिसरात डिजिटल प्रचारावर भर

रावेत परिसरात डिजिटल प्रचारावर भर

Published on

रावेत, ता. ८ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी, आकुर्डी परिसरामध्ये प्रचाराच्या पद्धतीत लक्षणीय बदल पाहायला मिळत असून, यावेळी पारंपरिक प्रचारासोबतच हायटेक आणि डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. सोशल मीडिया, मोबाइल अ‍ॅप्स, डिजिटल व्हिडिओ, व्हॉट्सॲप संदेश आणि लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रभागात उमेदवारांकडून फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रचार व्हिडिओ, रील्स आणि माहितीपर पोस्टर्स सातत्याने प्रसिद्ध केले जात आहेत. उमेदवारांचे कार्य, विकासकामांची माहिती, पुढील आराखडे आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. काही उमेदवारांनी स्वतंत्र डिजिटल टीम नेमून प्रचार अधिक व्यावसायिक पद्धतीने राबवला आहे.
तसेच, व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून प्रभागातील विविध सोसायट्या, युवक मंडळे, महिला बचत गट आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संपर्क साधण्यात येत आहे. प्रचाराचे डिजिटल साहित्य, व्हिडिओ संदेश, सभा व रोड शोची माहिती एका क्लिकवर मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे. यामुळे प्रचाराचा वेग आणि व्याप्ती दोन्ही वाढल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
डिजिटल प्रचारासोबतच एलईडी व्हॅन, मोठ्या स्क्रीनवरील व्हिडिओ प्रेझेंटेशन, क्यूआर कोडद्वारे माहिती मिळवण्याची सुविधा अशा नावीन्यपूर्ण कल्पनांचाही वापर होत आहे. काही उमेदवारांनी ऑनलाइन फीडबॅक फॉर्म, गुगल लिंकद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम सुरू केला असून, त्यामुळे मतदारांशी संवाद अधिक प्रभावी झाला आहे.
स्थानिक नागरिकांचेही या हायटेक प्रचाराकडे लक्ष वेधले गेले आहे. ‘‘पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्रचार पाहायला मिळतोय. माहिती पटकन मिळते, पण प्रत्यक्ष भेट आणि संवादही महत्त्वाचा आहे,’’ अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी व्यक्त केली.

उमेदवारांसमोर आव्हान
एकीकडे खर्चात बचत, तर दुसरीकडे तरुण मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता, ही डिजिटल प्रचाराची बलस्थाने मानली जात आहेत. मात्र, खोटी माहिती, अफवा आणि अतिप्रचार यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हानही उमेदवारांसमोर आहे.

PNE26V83600

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com