संस्कृती जपवणुकीचा समृद्ध वारसा : उदय हिल टॉप सोसायटी, रावेत
रावेत, ता. १४ : रावेत परिसरातील उदय हिल टॉप सोसायटी ही केवळ निवासी इमारतींचा समूह नसून, ती एक सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखली जाते. चार इमारती असलेल्या या सोसायटीमध्ये वर्षभर विविध पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंपरा जपत नव्या पिढीपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न येथे सातत्याने केला जातो.
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचा मोठा वाटा आहे. सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पारखे आणि सचिव मनीष अय्यर यांच्या नेतृत्वाखाली अशोक औताडे, स्वानंद राजे, सुचिता शिंदे, श्वेता ढोरे, सचिन साकोरे तसेच सर्व सहकारी व मित्रमंडळी कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्येष्ठ नागरिक संपतराव शिंदे हे मार्गदर्शन करतात.
सोसायटीमध्ये दरवर्षी हळदी-कुंकू, होळी व धुलिवंदन, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, रावण दहन, कोजागरी पौर्णिमा, वसूबारस, दिवाळी पहाट, दीपोत्सव आणि सार्वजनिक तुळशी विवाह अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, ४० वर्षांपूर्वीच्या खेळांच्या स्पर्धा गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केल्या जातात. ज्यामुळे मुलांना पारंपरिक खेळांची ओळख होते. नवरात्रात चंडिका हवनासह नऊ दिवस गरब्याचे आयोजन केले जाते. ही बाब सोसायटीच्या ऐक्य आणि उत्साहाचे प्रतीक ठरते.
सण-उत्सवांची परंपरा
आपले सण-उत्सव का आणि कशासाठी साजरे केले जातात, हे नव्या पिढीला समजावे यासाठी प्रत्येक कार्यक्रमामागील धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ समजावून सांगितले जातात. त्यामुळे लहान मुलेही या उपक्रमांमध्ये केवळ सहभागीच होत नाहीत, तर त्यामागील अर्थ जाणून घेतात. बालदिनदेखील उत्साहात साजरा केला जातो. ज्यामध्ये मुलांसाठी विविध खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले जातात.
पर्यावरण संवर्धनावर भर
उदय हिल टॉप सोसायटी ही ‘एसएमटीपी’ (सस्टेनेबल मॉडर्न टाउनशिप प्रोजेक्ट) अंतर्गत उभारण्यात आलेली आहे. पर्यावरण संरक्षण, पाणी पुनर्वापर, ऊर्जा संवर्धन, सौरऊर्जा वापर यासारख्या बाबींना या प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. परिसरातील रहिवाशांसाठी हिरवेगार लँडस्केप, खुली मैदाने यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक इमारतीवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात आलेली आहे.
रहिवाशांसाठी विविध सुविधा
उदय हिल टॉप सोसायटीमध्ये केवळ सांस्कृतिक उपक्रमांपुरतेच नव्हे, तर रहिवाशांच्या आरोग्य, मनोरंजन आणि क्रीडा उपक्रमांसाठीही उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे आधुनिक टर्फ मैदान, ज्यावर मुले व तरुण क्रिकेट-फुटबॉलसारखे खेळ खेळतात. तसेच सर्व वयोगटांसाठी उपयोगी पडणारे ओपन जिम उभारण्यात आले आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित खेळणी व खेळाचे मैदान असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीही मोकळ्या जागेत फिरण्यासाठी सोय करण्यात आली आहे. याशिवाय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली आणि सामुदायिक उपक्रमांसाठी खुले ॲम्फी थिएटर उपलब्ध आहे. या सुविधांमुळे सोसायटीतील रहिवाशांना निरोगी जीवनशैली, सर्जनशीलतेला वाव आणि सामाजिक संवादाची उत्तम संधी मिळत असून, उदय हिल टॉप सोसायटी केवळ राहण्यासाठी नव्हे; तर सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत आहे. या सोसायटीतील हे सर्व उपक्रम केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक मर्यादेत अडकून न राहता, सामाजिक सलोखा, आपुलकी आणि एकोप्याचा संदेश देतात. नव्या-जुन्या पिढीतील दुवा मजबूत करणे, परंपरांचा सन्मान राखणे आणि आधुनिक जीवनशैलीतही संस्कृती टिकवून ठेवणे हेच या सोसायटीचे वैशिष्ट्य बनले आहे.
याबाबत सोसायटीचे सदस्य अशोक औताडे आणि स्वानंद राजे म्हणाले, ‘‘विविध सण उत्सवांमुळे नवीन रहिवाशांना सोसायटीशी जोडले जाण्याची संधी मिळते. यातून आम्ही सर्व जण एकमेकांशी जोडले गेलो आहोत.’’
सुचिता शिंदे आणि श्वेता ढोरे सांगतात, ‘‘महिला वर्गासाठी हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम सामाजिक संवादाचे महत्त्वाचे माध्यम ठरतात. तरुण पिढीनेही पुढाकार घेतल्यामुळे उपक्रम अधिक रंगतदार होतात.’’
आकर्षक फाउंटन
सोसायटीच्या मधोमध आकर्षक फाउंटन उभारण्यात आले असून त्यामध्ये विविध रंगांचे मासे सोडण्यात आले आहेत. हे मासे डासांची अंडी व अळ्या खात असल्याने परिसरात मच्छरांचा उपद्रव कमी राहतो. त्यामुळे फाउंटन केवळ सौंदर्य वाढवणारा घटक ठरत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरतो. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक उपाययोजनांचा उत्तम नमुना निर्माण झाला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या मूळ संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो. आमचा प्रयत्न आहे की आमच्या सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या परंपरांचा अभिमान वाटावा. मुलांना केवळ सण साजरे करायला नव्हे, तर त्यामागचा इतिहास आणि मूल्ये समजायला हवीत.
- दत्तात्रय पारखे, अध्यक्ष, उदय हिल टॉप सोसायटी
आमची सोसायटी म्हणजे एक कुटुंब आहे. प्रत्येक कार्यक्रमात सर्वजण स्वयंसेवक म्हणून काम करतात. कोणी सजावट करतो, कोणी प्रसादाची व्यवस्था पाहतो, तर कोणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करतो. यामुळे परस्पर सहकार्य आणि मैत्री अधिक घट्ट होते.
- मनिष अय्यर, सचिव, उदय हिल टॉप सोसायटी
आजकाल अनेक ठिकाणी शेजाऱ्यांनाही ओळख नसते. पण, आमच्या सोसायटीत सण-उत्सवांमुळे सगळे एकत्र येतात. त्यामुळे एकमेकांशी जोडलेले राहणे, हीच खरी संस्कृती आहे असे माझे मत आहे.
- संपतराव शिंदे, ज्येष्ठ नागरिक, उदय हिल टॉप सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

