उपनगरांत शिवजयंतीनिमित्त जय्यत तयारी
पिंपरी, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रावेत, आकुर्डी, रहाटणी आदी उपनगरांच्या भागांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकाही काढल्या जाणार आहेत. रहाटणीमध्येही विविध कार्यक्रम होणार असल्याने तेथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
युद्धकला प्रात्यक्षिके
रावेत : रावेत परिसरात श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्यावतीने गुरुवारी (ता.१९) शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सोहळ्यात शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक, शिवप्रतिमा पूजन तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पोवाडे, भाषण, गायन, नृत्य आणि ऐतिहासिक एकांकिका यांमधून नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सकाळी मिरवणूक काढून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरही आयोजित केले जाणार आहे.
आकुर्डीत स्वराज्य रथ
आकुर्डी ः अखिल आकुर्डीगाव शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची जय्यत तयारी केली जात आहे. लोककला, पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा उलगडली जाणार आहे. शिवप्रतिमा पूजन, शिवजन्मोत्सव पाळणा आणि भव्य स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजरात निघणारी मिरवणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
रहाटणीच्या वाहतुकीत बदल
पिंपरी : रहाटणी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता.१९) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून परिसरातील वाहतूक मार्गात सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेसाठी बदल करण्यात आला आहे.
रहाटणी फाटा चौकाकडून गोडांबे चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई असून या मार्गावरील वाहने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. गोडांबे चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने गोडांबे चौक ते कोकणे चौक मार्गे जातील.
महादेव मंदिर/ पिंपळे सौदागर पोलिस चौकी टी पॉईंटकडून छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने महादेव मंदिर/पिंपळे सौदागर पोलिस चौकी येथून पी. के. चौकाकडून इच्छित स्थळी जातील. जीवन ज्योती रुग्णालय जवळील टी पॉइंटकडून छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने जीवन ज्योती रुग्णालयाजवळील टी पॉइंट ते पी. के. चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

