उसाच्या पाडेगाव जातीच्या ९ लाख रोपांची निर्मिती

उसाच्या पाडेगाव जातीच्या ९ लाख रोपांची निर्मिती

शिरगाव, ता. ६ : उसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून साखरेचे उत्पादन मिळावे, यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून एप्रिलअखेरपर्यंत उसाच्या पाडेगाव जातीची सुमारे २० लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत जवळपास ९ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना अल्प किमतीत त्याची विक्री केली जात आहे.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांना ही चांगल्या दर्जाची रोपे अल्प किमतीत उपलब्ध करुन दिली जातात. मागील वर्षी पाडेगाव २६५ , ८६०३२ ,१५०१२ या जातीची रोपे होती. यंदा त्यात पाडेगाव १८१३ या जातीचाही समावेश करण्यात आला आहे.

कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी राजेंद्र वणवे म्हणाले,‘‘आम्ही तयार केलेल्या रोपांची दरवर्षी सुमारे चारशे ते पाचशे एकरांवर लागवड होते. त्यामुळे, निरोगी ऊस कारखान्यावर गाळप करण्यासाठी उपलब्ध होतो. याशिवाय, शेतकऱ्यांनाही जास्त उत्पादन मिळते. यंदाच्यावर्षी २० लाख इतक्या रोपांचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत जवळपास ९ लाख रोपे तयार केली आहेत आणि आणखी काम सुरु आहे.’’

उसाच्या रोपाची वैशिष्ट्ये
- पाडेगाव २६५, ८६०३२,१५०१२ बरोबरच १८१३ ही नवीन जात
- रोप तयार करताना त्यावर ‘सीड स्ट्रीटमेंट’
- तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रोप तयार, चांगली वाढ झाल्यावर शेतकऱ्यांना वाटप
- रोपाची काळजी कशी घ्यावी ? अंतर्गत मशागत कशी करावी ? लावणीपूर्व आणि नंतर शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून माहिती
- लागवडीखालील शेताची तज्ज्ञांकडून पाहणी व मार्गदर्शन

पाडेगाव जातीच्या रोपांचे फायदे
- पिकाचे उत्पादन वाढते, पिकाची रोगप्रतिकारक शक्तीतही मोठी वृद्धी
- उसावर रोग पडत नाही, गवताची वाढही मर्यादित
- कमी खर्चात जास्त उत्पादन
- उत्तम दर्जाच्या आणि निरोगी उसाचे गाळप
- कमी वेळेत पिकाची काढणी

मागील दोन वर्षांपूर्वी आम्ही २ एकर क्षेत्रात ११ हजार रोपे लावली होती. हे रोप बाकी उसाच्या तुलनेत महिनाभर लवकर आले. रोग जास्त पडला नाही आणि रंग चांगला होता. त्याचा एकरी ९२ टन उतारा मिळाला.
- गणेश गराडे, ऊस उत्पादक शेतकरी, धामणे

‘‘आम्ही शेतकऱ्याला दिलेले रोपे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने उसाला उतारा चांगला मिळतो. शिवाय उत्पादनही चांगले मिळते. शेतकऱ्याला फवारणी, गवत काढणी अशा प्रकारच्या मशागतीवर जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागत नाही.’’
- साहेबराव पठारे, कार्यकारी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना, कासारसाई

‘‘आमच्याकडील उसाचे रोप घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली; तर त्याला पेरणी पूर्व व नंतरच्या मशागतीचे सर्व मार्गदर्शन मिळते. याशिवाय उत्पादन वाढते. त्यामुळे, शेतकरी चार पैसे जास्त कमावतो.
- बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम साखर कारखाना, कासारसाई


PNE24T94229

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com