लग्नाला नक्की यायचं हं... तुम्हाला आमचे आग्रहाचे निमंत्रण !

लग्नाला नक्की यायचं हं... तुम्हाला आमचे आग्रहाचे निमंत्रण !

Published on

शिरगाव, ता.२२ : मावळात घरोघरी जाऊन लग्नपत्रिका देण्याची पिढ्यानपिढ्यांची प्रथा कालबाह्य होऊ लागली असून सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात त्या पत्रिका केवळ देवापुढे ठेवण्यापुरत्या राहिल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि डिजिटल स्वरूपात लग्नपत्रिका पाठविण्याचा ‘ट्रेंड’ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच दूरध्वनी करुन मित्रमंडळी, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांना निमंत्रणे दिली जात आहेत.
काही दशकांपूर्वी घरातील लग्नसोहळ्यासाठी प्रत्येक सदस्य कमालीचा व्यस्त असे. परंतु, आता सोहळ्यातील विविध प्रकारच्या साहित्यांपासून जेवणावळी, कार्यालयाची आगाऊ नोंदणीपर्यंत सर्वच गोष्टी पैसे देऊन करुन घेतल्या जात आहेत. त्यामुळे, सोहळ्यातील उत्साह कृत्रिम झाला आहे. लग्नघरी सोहळा पूर्ण होईपर्यंत नातेवाईक, पै-पाहुण्यांचा राबता असायचा.
लग्नाचा मुहूर्त ठरल्यानंतर सर्वांत आधी कुलदेवतेसमोर निमंत्रण पत्रिका ठेवून मगच इतरांना निमंत्रण पत्रिका देण्यास सुरुवात व्हायची. सर्वात अगोदर बाहेरगावच्या आणि दूरवरच्या नातलगांना पहिल्यांदा घरोघरी जाऊन निमंत्रणे दिली जात असत. मित्रमंडळी, नातेवाईक, स्नेहीजनांनाही गावोगावी, घरोघरी जाऊन समक्ष निमंत्रण दिले जात होते. त्याने, सर्वांची ख्याली-खुशाली कळत होती. आपुलकीने गाठीभेटी होत असत. मात्र, लग्नसोहळ्यातील अशा अनेक गोष्टी चुटकीसरशी काही वेळातच माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहेत. आता लग्नपत्रिकेचे स्वरूपच बदलले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवरून डिजिटल पत्रिका पाठवली जात आहे. या लग्नपत्रिकांचा आजघडीला मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.

लहानग्यांची नावेही झाली गायब...
आमच्या मामाच्या, आत्याच्या, काकाच्या लग्नाला यायचं बरं का... या वाक्यशिवाय पूर्ण न होणारी पत्रिका आता फारशी पहायला मिळत नाही. तो जिव्हाळा आटला की, काळाच्या ओघात विरला हे लक्षात सुद्धा आले नाही. पत्रिका देणारा आणि स्वीकारणारा दोघांनाही वेळ नाही. पत्रिकेतील मजकूर आटोपशीर झाला आहे. फक्त आपले नाव आणि ठिकाण कुठे आहे ? निमंत्रण स्वीकारणारा व्यक्तीलाही एवढेच वाचतो. कारण, पुन्हा त्याला दूरध्वनी किंवा मेसेज येणार असतो.

डिजिटल पत्रिकेत नवरा-नवरीची छायाचित्रे
जुन्या जमान्यात नवरा-नवरीला केवळ मंडपातच एकमेकांना पहाता येत होते. परंतु, आता त्यांचे लग्नापूर्वी म्हणजे ‘प्री-विडिंग’ व्हिडिओ शूट केले जाते. डिजिटल स्वरूपात आलेल्या पत्रिकेवर नवरा आणि नवरी दोघांचीही छायाचित्रे असतात.

लग्नसोहळ्यांसाठीपूर्वी हजारावर पत्रिका छापल्या जायच्या. परंतु, अलीकडे २५, ५० किंवा जास्तीत शंभर पत्रिका छापल्या जातात. त्यामुळे, आमचा व्यवसाय अगदी मोडकळीस आला आहे. सध्या देवाला ठेवण्याइतक्याच पत्रिका छापल्या जातात. डिजिटल पत्रिकेची डिझाईन बनवून घेण्याचा काळ वाढला आहे.
- किरण जगदाळे, पत्रिका छपाई व्यावसायिक, सोमाटणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com