आईचं हरवलेलं पत्र... पुन्हा सापडेल का ?

आईचं हरवलेलं पत्र... पुन्हा सापडेल का ?

शिरगाव, ता.४ : सुमारे दोन दशकभरापूर्वी लहान मुले दररोज विटी-दांडू, गोट्या, भोवरा, आंधळी कोशिंबीर, लगोरी, शिरापुरी, लपंडाव यासारख्या विविध प्रकारच्या खेळांमध्ये रममाण होत असत. उन्हाळी सुट्टयांत तर मुलांना अगदी तहान-भूकेचेही भान नसे. मात्र, नव्या जमान्यात मोबाईलच्या जाळ्यात मुले अडकल्याने आता ग्रामीण भागांमधूनही हे मैदानी खेळ ‘बाद’ होऊ लागले आहेत. आईचं हरविलेले पत्र आता कुणालाही सापडत नाही.
काही दशकांपूर्वी शहरी, निमशहरी आणि खेडोपाड्यांमध्ये दूरचित्रवाणी (टीव्ही) घरोघरी आले नव्हते. तेव्हा, लहान मुलांमध्ये व्यायामाची आवड दिसून यायची. कालांतराने दूरदर्शन सुरु झाले तसा खेळांवरही थोडा-फार परिणाम होऊ लागला. परंतु, विटी दांडू, गोट्या, भोवरा, शिवणापाणी यासारखे अनेक खेळ खेळले जात होते. त्यासाठी महागड्या साहित्यांचीही गरज नसे. मात्र, हळूहळू निरनिराळ्या प्रकारच्या खासगी दूरचित्रवाहिन्या खास करुन कार्टून्सचे चॅनेल्स दिसू लागल्यावर एरव्ही दिवसभर मैदानात स्वच्छंदपणे बागडणाऱ्या लहान मुलांचे डोळे आणि कान टिव्हीकडे लागले आणि खेळातील मजा निघून गेली. सध्याच्या आधुनिक मोबाईल, संगणक युगात तर हेच प्रमाण अतिशय खाली आले आहे. अस्सल मराठी मातीमधील मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुले मोबाईल, टीव्हीने घरातच अडकून पडली आहेत. आजच्या परिस्थितीत शहरातील मुलांबरोबर ग्रामीण भागातील मुलेही मैदानी खेळ विसरत चालली आहेत. त्यापुढे पालकही काहिसे हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे पालकांबरोबरच शिक्षण तज्ञही चिंतेत पडले आहेत.

मैदानी खेळांची गरज कशासाठी ?
- मुलांचा शारीरिक, मानसिक, व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकास.
- वैयक्तिक व सांघिक खेळांमुळे नेतृत्व, निर्णय क्षमता, चातुर्य व संघभावनेची वाढ.
- प्रतिकूल परिस्थितीला कसे सामोरे जायचे ? याचे कळत-नकळत संस्कार.
- अप्रत्यक्षपणे शारीरिक व्यायाम होऊन शरीर मजबूत होण्यासाठी.

काय करता येईल ?
- मैदानी खेळांसाठी मुलांना प्रोत्साहन देणे
- पालकांनी स्वतः मुलांसमवेत खेळ खेळावेत.
- मुलांना मोकळी पटांगणे, जागा, मैदानांपर्यंत घेऊन जावे.
- गरजेनुसार क्रीडा मार्गदर्शक, तज्ञ, संस्थांची मदत घ्यावी.

कोणते खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर
- विटी-दांडू, गोट्या, सूर पारंब्या, आट्यापाट्या, भोवरा पाणी, चक्री, कोय रिंगण, लगोरी, लपंडाव, शिवणापाणी, लंगडी, शिरापुरी इत्यादी.

मामाच्या गावाचेही आकर्षण कमी...
पूर्वी उन्हाळी सुट्या लागल्या की, लगेच बच्चे कंपनी मामाच्या गावाला जाण्याची लगबग सुरु करायची. कारण, मामाकडे कोणाचीही आडकाठी न होता मनमुराद खेळ खेळता यायचे. आंबे खायला देखील कुणी अडवणारे नसायचे. आजी मनसोक्त लाड करायची. त्यामुळे, मुले सुट्या कधी लागतात. याकडे लक्ष द्यायची. आता मामालाही कामातून तेवढा वेळ मिळत नाही आणि मुलांनाही मामाच्या गावाचं तितकसं आकर्षण राहिले नाही.

मैदानी खेळ खेळल्याने शरीराची चपळता वाढते. त्याचा लाभ फक्त शारीरिक वाढीतच होतो असे नाही; तर सर्वांगीण विकासातही मदत होते. मुले मैदानावर यायला लागले की, आपोआप त्यांना खेळ खेळण्याची भावना वाढीस लागेल.
- मच्छिंद्र कापरे, क्रीडा शिक्षक शिरगाव.

मैदानावर जाऊन खेळ खेळल्याने साध्या साध्या गोष्टीने मुलांमध्ये निराशा येत नाही. अडचणीला कसे सामोरे जायचे ? याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होते. सकारात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढते. इतरांचे नैराश्य घालवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते.
- डॉ. नितीनकुमार माळी, शैक्षणिक समुपदेशक
PNE24U11728

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com