मावळात वरूणराजाच्या दूतांचे दर्शन दुर्मीळ

मावळात वरूणराजाच्या दूतांचे दर्शन दुर्मीळ

बी.आर.पाटील - सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १० : निसर्ग आणि पावसाचे अतूट नाते आहे. त्याचप्रमाणे पाऊस आणि पक्षी, किटकांचे नातेही घट्ट आहे. पावसाच्या आगमनाचे संकेत हे किटक, पक्षी देत असतात. परंतु, गेल्या काही दशकांत या नात्याला दृष्ट लागल्याचे दिसून येत आहे. वरुणराजाचे हे दूत दुर्मीळ होऊ लागले असून निसर्गप्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक त्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
पावसाच्या आगमनाअगोदर पर्यावरणात अनेक बदल घडत असतात. निसर्गाच्या समतोलात महत्त्वाची भूमिका बजावणारे पशु-पक्षी आणि किटक यांच्याकडून त्याची स्वतःच्या खास शैलीत नोंद घेतली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने चातक, पावशा पक्षी, मृग कीडा, वाळवी, तितर, वादळी पक्षी, कावळे यांचा समावेश आहे. परंतु, पर्यावरणाचा असमतोल आणि पावसाच्या लहरीपणाचा त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
आफ्रिकेतून येणारे चातक पक्षी पावसाचा अंदाज अगदी अचूक देत असतात. पाऊस वेळेवर येणार असेल; तर या पक्ष्यांचे आगमन लवकर होते. त्यांना यायला उशीर झाला तर पावसाचे आगमनही लांबते. त्याचप्रमाणे पाठीवर लाल रंग असणारा मृग किडा जर जास्त संख्येने दिसायला लागला; तर पाऊस येण्याचा हा शुभ संकेत असतो. त्याच्यासारखे आणखी बरेच किटक पावसाचा अंदाज अचूक देत असतात.
शेत, माळरानात अंगावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेल्या तितर (ग्रामीण भागात चित्तर) म्हणून ओळखला जाणाऱ्या पक्ष्यांचे थवे एका वेगळ्या सांकेतिक स्वरात ओरडू लागले, की पाऊस येतोय असे समजले जाते. याशिवाय, पावसाळ्यापूर्वी वारुळातून वाळवीचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने बाहेर पडू लागले की, पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वीचा काळ त्यांच्या प्रजननासाठी सर्वोत्तम मानला जातो.
पेरते होण्याचा संकेत
पावशा पक्षी हा शेतकरी आणि निसर्ग यांच्यामध्ये संदेशवाहकाची भूमिका बजावत असतो. पावशाचा आवाज आला; तर समजून जावे काही दिवसांत पाऊस येणार आहे. समुद्रात वावरणारे वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागले की पाऊस पडणार याचे नक्की संकेत मिळतात. त्यावेळी मच्छीमार आपल्या बोटी बंदरावर सुरक्षित ठिकाणी लावतात. तसेच खोल समुद्रातील मासेमारी बंद करतात.

काळ्या मुंग्या, कावळ्याचे घरटेही देते निरोप !
काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत. याशिवाय, कावळ्याने पूर्वेला घरटे बांधले; तर पाऊस चांगला पडतो. पश्चिमेला केल्यास सरासरी पाऊस तर दक्षिण आणि उत्तरेला असेल तर कमी पाऊस पडण्याचे संकेत मिळतात. तसेच जर घरटे झाडाच्या शेंड्यावर बांधले तर अत्यंत कमी पाऊस पडेल, असा अंदाज गेल्या शेकडो वर्षांपासून वर्तविला जात आहे.

बरेच पक्षी आणि किटक पावसाचा आणि दुष्काळाचा अचूक अंदाज सांगत असतात. त्यामागे गेल्या शेकडो वर्षांचा अभ्यास आणि अभ्यासकांचे निरीक्षण आहे. जे आजच्या आधुनिक युगातही खरे होत आहे हे विशेष. परंतु, अलीकडे निसर्गाचा समतोल ढळत असून हे पक्षी व किटक दुर्मिळ होत चालले आहेत, ही चिंतेची बाब झाली आहे.
- महेश महाजन, निसर्ग तज्ञ, फ्रेंड्स ऑफ नेचर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com