पुणे शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
बी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता ९ : घोडा मैदान आणखी सुमारे दीड वर्षांवर असूनही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या मतदारसंघाच्या आमदारकीची महत्त्वाकांक्षा अनेक जण बाळगणे सहाजिक आहे.
ही निवडणूक पुढील वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे इच्छुकांनी कितीही तयारी केली असली तरी त्याआधी बरेच काही घडणार आहे. त्यामुळे ऐन वेळीच चित्र स्पष्ट होईल.
सध्याचे जयंत आसगावकर शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री सतेज पाटील जिवाचे रान करीत आहेत. ही जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडली आणि निवडूनही आणली. अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही यात दुमत नाही.
रयत आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा प्रमुख संस्था पसंती देतात तोच या मतदारसंघाचा आमदार होतो अशी आजपर्यंतची परंपरा आहे. या कायम राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
आता महायुती या जागेसाठी पूर्ण तयारीत असल्याचे दिसते. शिवसेनेचे उमेदवारही रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार दत्ता सावंत हेही पायाला भिंगरी लावून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. आसगावकर यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपुष्टात येणार असल्याने निवडणूक तेव्हाच होण्याची दाट शक्यता आहे.
हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसचा उमेदवार न बदलण्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यामुळे आसगावकर पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता जास्त आहे. यानंतरही भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांनी आपले पत्ते आणखी खुले केलेले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी काय होईल याचे भाकीत वर्तविणे कठीण आहे. अर्थात पुण्याचा शिलेदार पुणेकरच ठरवतील, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. इतर चार जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील मतदार जवळपास दुप्पट आहेत.
जगदाळे यांची अनवाणी लढाई
कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे गेल्या २१ वर्षांपासून अनुदानासाठी लढाई लढत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी फिरण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. यावेळी तेही सर्व तयारीनिशी उतरण्यास सज्ज होत आहेत. आजवर शेकडो आंदोलने करून त्यांनी शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न लावून धरले आहेत. त्यांच्याकडे भावी कारभारी म्हणून पहिले जात आहे, परंतु कसे आणि कोणत्या पक्षाकडून लढणार, हे त्यांनी अजून स्पष्ट केले नाही
---
माझ्या आमदारकीच्या काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यार्थी यांच्या अनेक प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. जुनी निवृत्तिवेतन योजना हा महत्त्वाचा मुद्दा असेल.
- जयंत आसगावकर, आमदार, पुणे शिक्षक मतदारसंघ
---
मी मागील दोन्ही निवडणुका अपक्ष म्हणूनच लढलो होतो आणि एक वेळा जिंकून आमदारही झालो होतो. यावेळीही माझी तीच भूमिका असणार आहे. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षापेक्षा मी मतदारांवर विश्वास ठेवणारा आहे.
- दत्तात्रेय सावंत, माजी आमदार
---
आम्ही युती पाळणारे आहोत. त्यामुळे आमचा पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. हीच आमची परंपरा राहिली आहे.
- प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष, भाजप, पुणे उत्तर जिल्हा
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.