ट्रॅव्हल्स बसच्या थांब्यांनी अपघातांना निमंत्रण
संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता. १३ : काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रहाटणी फाटा व काळेवाडी फाट्याच्या अंतर्गत असणारा बीआरटीएस रस्त्याला असंख्य ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी स्वतःची दुकाने थाटली असून रस्त्याच्या कडेला हे व्यावसायिक त्याच ठिकाणी आपल्या ट्रॅव्हल बसला थांबा देत आहेत. प्रवासी घेण्यासाठी बसचालकांची चढाओढ हे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या मुजोरीला चाप लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
काळेवाडी बीआरटीएस मुख्य रस्त्याला लागून असलेल्या रहाटणी फाटा येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येते. येथे मजूर अड्डा व खासगी ट्रॅव्हल व्यावसायिकांची दुकाने एकाच ठिकाणी असल्याने गरीब काम करणारे मजूर तसेच ट्रॅव्हल्स दुकानात तिकीट खरेदी करून प्रवासाला जाणारे प्रवासी यांची गर्दी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते. सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत देखील गर्दी जास्त असते. या गर्दीतच बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या विविध बस कोणत्याही नियमांना न जुमानता व पोलिस प्रशासनाचे आदेश न पाळता उभ्या असल्याच्या दिसून येतात. पदपथ हे अत्यंत अडचणीचे व अरुंद असून तेथेच ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.
विरोध करणाऱ्यास मारहाण
ट्रॅव्हल्स एजंट कंपन्यांची दुकाने व बससाठी वेगळी वाहनतळाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. या ठिकाणी मात्र मुख्य रस्त्यावर एका मागे एक व कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता या बसला थांबा देऊन प्रवाशांना बसवले जात आहे. त्यासाठी इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे. त्याला विरोध दर्शविणाऱ्या सामान्य नागरिकांना धमकावणे तसेच काही वेळा हाणामारी झाल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे येथे कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करण्याची गरज दिसून येत आहे.
व्यावसायिकांची मनमानी
सांगवी वाहक पोलिस ठाण्याकडून यापूर्वी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले होते. सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत वाहनांना मज्जाव करण्यासाठी नियमावली व सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष न देता ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी चालूच असलेली दिसून येते. हे फलक फक्त नावाला असल्याचे दिसून येते.
मोठी आकाराची बस रस्त्यावरच उभी केल्याने इतर वाहन चालकांना रस्त्याने जाणे येणे कठीण होत असून कोणत्याही प्रकारचे पांढरे पट्टे किंवा वाहनतळासाठी जागा नसल्याने व बसच्या मोठ्या आकारामुळे छोटे वाहन चालक मात्र त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियमांची पायमल्ली...
- मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर बस थांबवणे
- कोणत्याही सिग्नल किंवा इंडिकेटर न देता बस धोकादायक पद्धतीने वळवणे
- ट्रॅव्हल्स तिकीट बुकिंग व्यावसायिकांचा बस दुकानासमोरच थांबविण्यासाठी आग्रह
- बस थांबल्याने प्रवासी भाड्याची विचारणा करणाऱ्या रिक्षांची गर्दी
- तास न तास बस थांबल्याने रस्त्यावर होणारी गर्दी
- विविध ऑनलाइन ॲप वरुन गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना थांबा
या संदर्भात ट्रॅव्हल्स बसवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असून त्याबाबत ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही ते ऑनलाइन ॲप वरून बस थांबे देत असल्यामुळे बस चालक सूचना पाळत नाहीत. मात्र त्यावर देखील कारवाई केली जाईल
- प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग
हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्याने आयटीआय व हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांची जास्त वर्दळ असते. या रस्त्यावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात बस चालक व ट्रॅव्हल्स व्यावसायिक गर्दी करून उभे असतात. अशा वेळी अपघात होऊ शकतो. त्याला जबाबदार
कोण ?
- दिनेश वाणी, काळेवाडी
भाजी मंडई व व्यावसायिकांची दुकाने असून महिला आणि लहान मुलांना येण्या जाण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. तेथे प्रवासी घेण्यासाठी बसचालकांची चढाओढ लागलेली असते. यामुळे अपघात होऊन मोठी घटना होऊ शकते.
- हर्षदा दुसाने, रहिवासी, रहाटणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.